ठाण्यातील खड्डे भरण्याच्या कामांची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

ठाण्यातील खड्डे भरण्याच्या कामांची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

ठाणे (प्रतिनिधी) : 
संततधार पडणाऱ्या पावसाने उसंती दिल्यानंतर महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले असून नुकतीच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरात विविध ठिकाणी  सुरु असलेल्या कामाची पाहणी करून खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागास दिले. 

अतिवृष्टीमुळे शहरातील विविध रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ भरण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामाची आज पाहणी केली. यावेळी जयस्वाल यांनी आवश्यकता वाटल्यास मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वाढविण्याच्या सुचना अधिका-यांना दिल्या. यावेळी जयस्वाल यांनी पातलीपाडा, आनंदनगर बस डेपो, होरायझन शाळा, लालानी रेसिडेन्सी, ब्रह्मांड, एअर फोर्स स्टेशन, कोलशेत, ढोकाळी नाका, मुलुंड चेक नाका आणि इतर ठिकाणी  रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली तसेच कामाची गती व दर्जा या विषयी अभियंत्यांना सूचना दिल्या.

या पाहणीदरम्यान जयस्वाल यांनी ब्रह्मांड ते गायमुख या  दोन्ही बाजूच्या सर्विस रोडची पाहणी करून सर्व्हिस रोडवरील सर्व खड्डे बुजवण्याचे तसेच हे दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडचे डांबरीकरण करण्याचे आदेश नगर अभियंता रवींद्र खडताळे यांना दिले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित येत असलेल्या उड्डाण पुलावर पडलेल्या खड्यांची पाहणी करून महामंडळाचे उपअभियंता अनिरूद्ध बोराडे यांनांही उड्डाण पुलावरील खड्डे तात्काळ भरण्याच्या सूचना केल्या.

सदर पाहणी दौ-यामध्ये जयस्वाल यांच्यासोबत उपआयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता रवींद्र खडताळे, उप नगर अभियंता भरत भिवापूरकर, कार्यकारी अभियंता विकास ढोले, चेतन पटेल, सुधीर गायकवाड, रामदास शिंदे, प्रकाश खडतरे, उप अभियंता संजय कदम, रूपेश पाडगावकर आदी अधिकारी उपस्थित होते.