महापालिका निवडणूक; त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती विरोधात रविवारी कल्याणात बैठक

महापालिका निवडणूक; त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती विरोधात रविवारी कल्याणात बैठक

कल्याण (प्रतिनिधी) : मुंबई वगळता इतर महापालिकांच्या निवडणूक त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीने घेण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला कल्याण डोंबिवलीतून विरोध होऊ लागला आहे. शासनाच्या या निर्णयाला सामुहिकरित्या विरोध करण्याच्या मुद्यावर रविवारी, २६ सप्टेंबर रोजी कल्याणमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी-कॉन्ग्रेस पक्षांच्या महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाने नगरपालिका, महापालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेत पुन्हा एकदा बदल करीत तिन सदस्यांचा प्रभाग लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय घेउन सरकारने आपला धरसोडपणा दाखविला आहे. २००१ पासून प्रभाग रचनेचा हा गोंधळ सुरु आहे. २०१९ मध्ये सत्तेत येताच उद्धव ठाकरे सरकारने २०१६ चा निर्णय बदलून सर्व नगरपालिका व महापालिका यांच्या निवडणुका एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होतील असा निर्णय घेतला होता.

दरम्यान, दि. २५ ऑगस्ट २०२१ रोजी राज्य निवडणुक आयोगाने अध्यादेश काढून सर्व नगरपालिका, महापालिकाना प्रभाग निश्चित करण्याचे आदेश दिले असताना २२ सप्टेंबर २०२१ रोजी राज्य मंत्रीमडळाने मुंबई महापालिका वगळता अन्य महापालिकांसाठी त्रि सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने लहान राजकीय पक्षांना नुकसान होऊन मोठ्या राजकीय पक्षांना त्याचा लाभ होणार असल्याचा आरोप  केला जाऊ लागला आहे. एनकेन प्रकाराने नगरपालिकांची, महापालिकांची सत्ता आपल्या हातात ठेवण्याचे हे स्वार्थी राजकारण आहे. लहान पक्ष, नागरिक संघटनांना निवडणुकापासून दूर ठेवण्याचे राजकारण आहे. काल कॉंग्रेस पक्षानेही मंत्रीमंडळाने घेतलेल्या या निर्णयाला विरोध केला आहे. लोकशाहीला ही पद्धती मारक आहे. महाराष्ट्र वगळता अन्य कोणत्याही राज्यात अशी बहु-सदस्यीय प्रभाग पद्धती नाही, मग महाराष्ट्रातच का, मुंबईत ‘एक प्रभाग, एक नगरसेवक’ पद्धत लागू करताना उर्वरित महाराष्ट्रात त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा दुजाभाव का, असा सवाल केला जात आहे.

कल्याण-डोंबिवलीतील इतर लहानमोठे पक्ष-संघटना, सामाजिक संघटना, प्रस्थापित पक्षांमधील सर्वसामान्य कार्यकर्ते रविवारी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे एक बैठक घेऊन आपली रणनिती ठरविणार आहेत, अशी माहिती आम आदमी पार्टीचे कल्याण-डोंबिवलीचे अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड (मोब. ९६१९७५०००१) यांनी दिली आहे.