माझी उमेदवारी म्हणजे बंड नव्हे - धनंजय बोडारे 

माझी उमेदवारी म्हणजे बंड नव्हे - धनंजय बोडारे 

कल्याण (प्रतिनिधी) :
माझ्या उमेदवारीला बंड म्हणता येणार नाही. हे बंड नाही. एकाने स्वार्थासाठी केले तर ते बंड असते. मात्र सर्वांनी मिळून केले तर ते विचाराचे बंड ठरते, अशी भूमिका कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर-अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांनी आपल्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केली.

यावेळी बोडारे पुढे म्हणाले की, कल्याण पूर्व भागात २६ पैकी १८ तर उल्हासनगरमधील १० नगरसेवक सेनेचे आहे. येथील ग्रामीण भागातील ग्राम पंचायतीमध्येही सेनेचेच वर्चस्व आहे. येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते मला निवडणुक लढविण्याचा आग्रह धरला-उमेदवारी दिली. अन्याय–अत्याचाराविरुद्ध आम्ही केलेले हे बंड आहे. भकास कल्याण पूर्वचा विकास करण्यासाठी आमची लढाई असल्याचे ते म्हणाले.

यावेळी सेनेचे उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे म्हणाले की, कल्याण पूर्व मतदारसंघात येथील शहरी भाग, ग्रामीण भाग व उल्हासनगरचा काही परिसर असे तीन भाग आहेत. या तिन्ही ठिकाणी सेनेचे वर्चस्व आहे. एकूण येथे २८ नगरसेवक आहेत. या सर्वांनी मिळून एकमताने धनंजय बोडारे यांना विधानसभा निवडणुकीला अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले आहे. शिवसैनिकांनी मान्यता दिलेले ते उमेदवार आहेत. येथील जनतेला शेठ नको तर सेवक आमदारच हवा आहे, बदल हवा आहे. कल्याण पूर्व मतदारसंघाचा विकास करण्यासाठी बोडारे यांना निवडून द्यायचे आहे. त्यांचे निवडणूक चिन्ह संगणक आहे. हा मतदारसंघ जिंकून आम्ही शिवसेना पक्षाप्रमुखांना भेट देणार आहोत आणि हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्याचे दाखवून देऊ, असेही पालांडे म्हणाले.

याप्रसंगी उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, चंद्रकांत बोडारे, नगरसेवक निलेश शिंदे, महेश गायकवाड, नगरसेविका शितल मंढारी, माजी नगरसेवक प्रशांत काळे, कैलास शिंदे, शांताराम पवार, शरद पावशे, शरद पाटील, नितीन पाटील, राजेश दाखिनकर, पुष्पा ठाकरे आदीसह उल्हासनगर येथील काही नगरसेवकही उपस्थित होते. यावेळी निवडणूक प्रचार कार्यालयाचे प्रमुख म्हणून रमाकांत देवळेकर यांची नियुक्ती करण्यात आली.