माथेरानमधील रस्त्याला केडीएमसीच्या उपायुक्तांचे नाव

माथेरानमधील रस्त्याला केडीएमसीच्या उपायुक्तांचे नाव

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विद्यमान उपायुक्त रामदास कोकरे यांनी कर्जत नगरपरिषदेचे, तसेच माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी असताना माथेरान येथे यशस्वीपणे ‘कचरा मुक्त डंपिंग ग्राऊंड’ योजना राबवित तेथील पर्यावरण पूरक विकासात दिलेल्या भरीव कार्याबद्दल माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेने तेथील रस्त्याला रामदास कोकरे यांचे नाव देत त्यांचा सन्मान केला आहे. 

कोकरे हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रुजू होण्यापूर्वी ते कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी होते. त्याचवेळी त्यांच्याकडे माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील होता. त्‍यांनी त्यापूर्वी वेंगुर्ला व कर्जत येथे राबविलेली कचरा मुक्त डंपिंग ग्राऊंड ही संकल्पना महाराष्ट्राचे मिनी हिल स्टेशन म्हणून ओळखल्या जाणा-या माथेरानमध्ये देखील राबविली. तेथे ही संकल्पना कोकरे यांनी यशस्वी केली. त्यांनी माथेरानमधील डंपिंग ग्राऊंडचे रुपांतर खेळाच्या मैदानात केले. माथेरानच्या पर्यावरण पूरक विकासात त्यांनी दिलेल्या या योगदानाची दखल घेत माथेरान गिरीस्थान नगर परिषदेने तेथील सेटविला नाका ते कचरा डेपो या रस्त्याला ‘श्री. रामदास तुकाराम कोकरे मार्ग’ असे नाव देत कोकरे यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

सदर नामकरण सोहळ्यास कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपायुक्त उमाकांत गायकवाड, माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव आदी मान्यवर दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. रामदास कोकरे यांनी कल्याण-डोंबिवलीत हजर झाल्यापासून महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ‘शुन्य कचरा’ मोहिम राबविण्यासाठी अनेकविध अभिनव संकल्पना राबविल्या आहेत. त्यांच्या या सन्मानामुळे कल्याण-डोंबिवलीकरांच्या कोकरे यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.