कळवा पुलाजवळील चौपाटीला शिवाजी महाराजांचे नाव द्या - एमएसएस

कळवा पुलाजवळील चौपाटीला शिवाजी महाराजांचे नाव द्या - एमएसएस

ठाणे (प्रतिनिधी) : 
ठाणे शहरात होणार्‍या विकास कामांमुळे ठाणे खरंच स्मार्ट सिटीकडे वळत आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. मात्र कळवा नाका येथील नवीन उड्डाणपुलाचे काम करीत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा झाकून ठेवण्यात आला आहे. सदर पुतळा खारेगाव रेतीबंदर येथील चौपाटीच्या मध्यभागी प्रतिष्ठापित करून सदर चौपाटीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे नाव देण्याची मागणी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मंगेश आवळे यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिलेल्या निवदेनात केली आहे.

कळवा पुल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे लोकार्पण तत्कालिन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. अल्पावधीत महाराजांच्या पुतळयामुळे सदर परिसराला वेगळे महत्व प्राप्त झाले. मात्र सदर परिसरात नवीन पुलाच्या बांधकामामुळे सदर पुतळा दुर्लक्षित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हा पुुतळा नवीन पुलाच्या कामामुळे पूर्णपणे झाकला गेला आहे. तरी सदर पुतळा खारीगाव येथील महापालिकेच्या मार्फत चौपाटी सुशोभीकरणाचे काम चालू आहे. त्या चौपाटीला ‘छत्रपती शिवाजी महाराज चौपाटी’ असे नामकरण करावे व हा पुतळा चौपाटीच्या मध्यभागी बसवावा, अशी मागणी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांना मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे, शहराध्यक्ष संतोष मोरे, सचिव सुभाष भोसले व विकास खामकर आदींनी निवेदन दिले. 

छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे जनक आहेत. त्यांनी प्रथम स्वराज्याचे आरमार उभारले. समुद्रावर देखील अधिराज्य गाजविण्याचे विचार मांडले होते. असे आधुनिक विज्ञानवादी स्वराज्याचे जनक येणाऱ्या पिढीस स्फुर्तीदायक ठरू शकतील, म्हणूनच हा पुर्णाकृती पुतळा रेतीबंदर खारीगाव चौपाटीवर प्रतिष्ठापन करून सदर चौपाटीलाही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांनी केली आहे.