मोठ्या थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रातून जाहीर करणार – दिपेश म्हात्रे 

मोठ्या थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रातून जाहीर करणार – दिपेश म्हात्रे 

कल्याण (प्रतिनिधी) :
मालमत्ता कर थकवणाऱ्या १०० मोठ्या थकबाकीदारांची नावे त्यांनी कर न भरल्यास वृत्तपत्रातून जाहीर करण्यात येतील, अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती दिपेश म्हात्रे यांनी पत्रकारांना दिली.

महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी स्थायी समितीची बंद दाराआड सभा घेण्यात आली. त्यानंतर पत्रकारांना माहिती देण्यासाठी म्हात्रे यांनी पत्रकारांना बोलावले होते. यावर्षी महापालिकेचा ४७८ कोटीचा इष्टांक दिला आहे. थकबाकीदारांचा १२०४ मालमत्ता सील करण्यात आल्या असून चेक बाउन्स झालेल्या १२२ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशीही माहिती म्हात्रे यांनी दिली. 

गेल्या १० वर्षात अशी आढावा बैठक घेण्यात आली नव्हती, असा दावाही म्हात्रे यांनी केला. या पत्रकार परिषदेनंतर लगेचच स्थायी समितीचे एक सदस्य वामन म्हात्रे यांनी बंद दाराआड झालेली बैठक ही विकासकांच्या हितासाठी होती आरोप पत्रकारांशी बोलताना केला. बड्या थकबाकीदारांवर महापालिका कारवाई करत नाही, असा दावा करत म्हात्रे यांनी बड्या थकबाकीदारांकडून वसुली होत नाही तोपर्यंत नागरिकांनी कर भरू नये असा सल्लाही त्यांनी दिला.