कल्याणातही राष्ट्रवादीची निदर्शने

कल्याणातही राष्ट्रवादीची निदर्शने

कल्याण (प्रतिनिधी) : 
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतरांच्या विरोधात 'ईडी'ने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी कल्याण शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी पवारांच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

यावेळी कल्याण पश्चिमेतील आंबेडकर उद्यान ते तहसील कार्यालयापर्यंत मानवी साखळी बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव पारसनाथ तिवारी, कल्याण पश्चिम विधानसभेचे अध्यक्ष ऍड. प्रल्हाद भिलारे, संदीप देसाई, उमेश बोरगावकर, समीर वानखेडे, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, माजी नगरसेवक जावेद डॉन, हमीद शेख, रेखा सोनवणे, सुरय्या पटेल, संगीता मोरे, सुनिता देशमुख आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदारांना कारवाई रद्द करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.

उपस्थितांना संबोधित करताना पारसनाथ तिवारी यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत पवारांची धास्ती घेत सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगत ही कारवाई रद्द केली नाही तर, आमरण उपोषण, जेलभरो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.