नेचर पार्क म्हणजे कल्याणच्या वैभवात भर घालणारे उद्यान – खा. कपिल पाटील

नेचर पार्क म्हणजे कल्याणच्या वैभवात भर घालणारे उद्यान – खा. कपिल पाटील

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण पश्चिममध्ये सुसज्ज आणि सर्व सुविधांनी संपन्न उद्यान हे आमदार नरेंद्र पवार यांचे स्वप्न होते. पाच वर्षे समाजकारण आणि कल्याणच्या विकासासाठी काम करत असताना कल्याणकरांना भेट दिलेले हे आगळेवेगळे नेचर पार्क (उद्यान) कल्याणच्या वैभवात भर घालणारे ठरेल, असे मत खासदार कपिल पाटील यांनी शुक्रवारी कल्याण येथे व्यक्त केले. 

आ. नरेंद्र पवार यांच्या विशेष निधीतून आधारवाडी जेलसमोर साकारलेल्या महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी नेचर पार्क या उद्यानाचे लोकार्पण भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कल्याण शहराला पाणी, वीज, रस्ते यासोबतच इतर समृद्ध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. राज्याच्या आणि केंद्राच्या बरोबरीने विकास करण्याचे काम सातत्याने होत आहे. उद्यानाचे लोकार्पण हा कल्याणसाठी महत्वपूर्ण क्षण आहे. आ. पवारांचा जेष्ठ नागरिक व बालकांना बागडण्यासाठी एक समृद्ध उद्यान साकारण्याचा ध्यास आज पूर्णत्वाला आला आहे. कल्याणच्या वैभवात भर घालणारे हे उद्यान महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावामुळे अजून परिपूर्ण आणि सन्मानाचे झाले आहे, असेही खा. पाटील म्हणाले.

समृद्ध कल्याणचा ध्यास घेऊन गेली ५ वर्षे काम करत असताना सुसज्ज आणि कल्याणकरांसाठी एक सुसज्ज उद्यान साकारण्याचे मनी बाळगलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे. हे माझेच नाही तर तमाम कल्याणकरांची स्वप्नपूर्ती आहे. उद्यानात करण्यात आलेली अनेक औषधी, फळ व फुलझाडांची लागवड हे या उद्यानाचे वैशिष्ट्य आहे. जनसेवक म्हणून काम करत असताना राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना अंत्योदय घटकापर्यंत घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सामान्य माणसाच्या गरजा ओळखून त्यादृष्टीने मार्गक्रमण केले. शहरीकरणाच्या परिवर्तनासोबतच शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने काम केले आहे. महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याला प्रेरित होऊन त्यांच्या नावाने उद्यान साकारले असल्याचे मत आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले.

यावेळी शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, नगरसेवक वरुण पाटील, नगरसेवक अर्जुन भोईर, नगरसेवक दया गायकवाड, नगरसेवक जयवंत भोईर, नगरसेविका वैशाली पाटील, ठाणे पालघर विभागीय सरचिटणीस राजाभाऊ पातकर आदी मान्यवरांसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.