नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्यासाठी आंदोलन

नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्यासाठी आंदोलन

ठाणे (प्रतिनिधी) : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी ठाण्यात मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. 

ठाण्यातील कळवा नका येथे नवी मुंबई राष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. येत्या २४ जूनपर्यन्त याबाबत योग्य निर्णय न झाल्यास सिड़कोला घेराव घालण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी यापूर्वी राज्य आणि केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आलेली आहे. तरी देखील अचानकपणे १७ एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी ओबीसी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हे सारे प्रकल्पग्रस्त तसेच सामाजिक व राजकीय संघटना आजच्या मानवी साखळी आंदोलनात सहभागी झाले होते.

दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याच्या मागणीसाठी अनेक पत्रे देण्यात आली. बैठकांचे आयोजन करण्याविषयी सिडको प्रशासन, मंत्री आणि राज्य शासनाला विनंती करण्यात आली. मात्र, भेटीगाठी न दिल्याने कृती समितीला आजचे हे आंदोलन करावे लागले, अशी माहिती दशरथ पाटील यांनी दिली.

दि. बा. पाटील यांनी अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. मात्र स्वतचे नाव कोणत्याही संस्थेला लावले नाही. या भागातील समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती झाली. दि. बा. पाटील यांनी जमिनीच्या मोबदल्यात प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के मिळवून दिले. हा निर्णय देशातील महत्त्वपूर्ण म्हणून मानला जातो. यासाठी ५ हुतात्मे झाले. याबद्दल लोकांच्या मनात चीड आहे साडेबारा टक्के योजनेमुळे येथील कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारली. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या तोडीचा नेता दि. बा. पाटील यांच्या रुपाने  महाराष्ट्रात उदयास आला. बहुजन समाजात त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. ठाणे, पालघर, रायगड येथून या निमित्ताने मोठी क्रांती निर्माण होईल, असा आशावाद दशरथ पाटील यांनी व्यक्त केला.

आपल्या बुलंद आवाजाने महाराष्ट्र विधीमंडळात तसेच खासदार म्हणून संसदेत शेतकऱयांचे, कष्टकऱयांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न दि. बा. पाटील यांनी पोटतिडकीने मांडले. ओबीसी समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा प्रश्न अशा अनेक आंदोलनांत भाग घेऊन त्यांनी तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे त्यांचे हे कार्य नव्या पिढीला स्फूर्तिदायी ठरावे यासाठी त्यांच्या कर्मभूमीत त्यांची स्मृती जागरूक रहावी यासाठी नवी मुंबईत विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.