नवी मुंबईचा प्रभात कोळी ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने’ सन्मानित

नवी मुंबईचा प्रभात कोळी ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने’ सन्मानित

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : 
महाराष्ट्राचे सुपुत्र मर्झबान पटेल यांना हॉकीतील योगदानासाठी  द्रोणाचार्य जीवनगौरव तर नितीन किर्तने यांना टेनिसमधील योगदानासाठी ध्यानचंद पुरस्कार राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर नवी मुंबई येथील जलतरणपटू प्रभात कोळी यास मानाचा ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार- २०१९’ नुकतेच प्रदान करण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू, मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल निशंक, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन आदी मंत्री, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या सचिव उपमा चौधरी  यांच्यासह विविध क्षेत्रातातील मान्यवर  यावेळी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात हॉकी प्रशिक्षक मर्झबान पटेल यांना द्रोणाचार्य जीवनगौरव तर टेनिस प्रशिक्षक नितीन किर्तने यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला. सागरी जलतरणातील उत्तम कामगिरीसाठी जलतरणपटू प्रभात कोळी यास मानाच्या ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने’ गौरविण्यात आले. प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.

सागरी जलतरणातील साहसासाठी प्रभात कोळीचा सन्मान

सर्वात कमी वयात जपान सुकानु चॅनल पार करण्यासाठी आणि १ महिन्यापेक्षाही कमी कालावधीत दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शेजारील सहा खुले वॉटर ब्रॉडकास्ट पूर्ण करण्याच्या कामगिरीसाठी  प्रभात कोळी याची ‘लिम्का बुक ऑफ नॅशनल रेकॉर्डमध्ये’ नोंद झाली आहे. नवी मुंबई येथील नेरूळ भागातील प्रभात कोळी या १९ वर्षाच्या युवा जलतरणपटूने न्यूझीलंडमधील कूक स्ट्रीट, इंग्लीश खाडी, कॅटलिना, कैवी, सुगारु, नॉर्थ चॅनल, जिब्राल्टरची सामुद्रधुनी आणि केपटाऊनचा समुद्र असे आठ खडतर टप्पे पूर्ण केले आहेत. त्यातील काही टप्प्यांत सर्वात तरूण खेळाडू म्हणून त्याच्या नावाची नोंद  झाली आहे.  प्रभातच्या साहसी कार्याची नोंद घेऊन त्याला ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने’ गौरविण्यात आले आहे.