शिवकालीन आरमार-शस्त्र व सौर उर्जा प्रदर्शन डोंबिवली येथे संपन्न

शिवकालीन आरमार-शस्त्र व सौर उर्जा प्रदर्शन डोंबिवली येथे संपन्न

डोंबिवली (प्रतिनिधी) :
शिवकालीन आरमार-शस्त्र व सौर उर्जा प्रदर्शन या डोंबिवली येथे आयोजित दोन दिवसीय प्रदर्शनात सुमारे २७ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यानिमित्ताने सौर उर्जेचा वापरा संदर्भात घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्या शाळांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.  

रिजेन्सी निर्माण लि., डावखर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. व समर्थ पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने सदर प्रदर्शन कल्याण शिळ रस्त्यावरील रिजेन्सी अनतम् येथे आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या हस्तेच या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐतिहासिक कल्याणच्या खाडी किनारी स्वराज्याच्या आरमार उभारले होते. त्याची स्मृती जागविणाऱ्या स्वराज्याच्या आरमारातील साकारण्यात आलेली गुराबा जहाजाची थ्री डी प्रतिकृती या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरली होती. याप्रसंगी गिरीश जाधव यांच्या संग्रहातील शिवकालीन शास्त्रांचे प्रदर्शन देखील यानिमित्ताने भरविण्यात आले होते.

तसेच सौर उर्जा वापराबाबतच्या प्रकल्पांचे प्रदर्शन व आंतर शालेय स्पर्धा यानिमित्ताने घेण्यात आली. या स्पर्धेत ३१ शाळांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी तयार केलेले सौर ऊर्जेवरील प्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात आले होते. सदर स्पर्धेत ५ वी ते ७ वी गटाचे प्रथम पारितोषिक- न्यू श्री वाणी विद्यालय (कल्याण), द्वितीय- सिस्टर निवेदिता हायस्कूल (डोंबिवली), तृतीय- टिळक विद्यामंदिर (डोंबिवली), तर उत्तेजनार्थ- एसआयए इंग्लिश स्कूल (डोंबिवली) यांना तर ८ वी ते १० वी गटाचे प्रथम पारितोषिक- आर्या गुरुकुल हायस्कूल (डोंबिवली), द्वितीय- सिस्टर निवेदिता हायस्कूल (डोंबिवली) व एसआयए इंग्लिश स्कूल (डोंबिवली), तृतीय- सेंट जॉन हायस्कूल (डोंबिवली) तर उत्तेजनार्थ- गायत्री विद्यालय (कल्याण) यांनी पटकावले. 

सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांना एकूण एक लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. यावेळी डावखर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक संतोष डावखर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. प्रदर्शनामुळे विद्यार्थी व नागरिकांमध्ये सौर उर्जेचा अधिकाधिक वापर करण्याबाबत जनजागृती होऊन तिला हातभार लागेल असा विश्वास संतोष डावखर यांनी यावेळी व्यक्त केला.

सदर प्रदर्शनाला कल्याण डोंबिवली परिसरातील ९२ शाळांमधील २६ हजार ३०० विद्यार्थी आणि शिक्षकांनी उपस्थिती लावली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन चौधरी, प्रविण निर्गुण, जगदीश म्हात्रे, प्रकाश थोरात, वैभव कोल्हे, यांनी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण कार्यक्रमाचे व प्रदर्शनाचे सूत्रसंचालन प्रणव भांबुरे यांनी केले.