राष्ट्रवादी कॉंग्रेस कल्याण जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी जाहीर

राष्ट्रवादी कॉंग्रेस कल्याण जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी जाहीर

कल्याण (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कल्याण जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी मंगळवारी कल्याण येथे जाहीर करण्यात आली. तब्बल २५ उपाध्यक्ष, १३ सरचिटणीस, ४ सचिव व २  कोषाध्यक्ष यांचा समावेश असलेल्या ५६ पदाधिकाऱ्यांची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. जगन्नाथ शिंदे व कार्याध्यक्ष वंडार पाटील यांनी कल्याण येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केली.

राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी कल्याण जिल्हा कार्यकारिणीची यादी मंजुरीसाठी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविली होती. सदर कार्यकारिणीला प्रदेश अध्यक्षांनी मान्यता दिल्याचे प्रदेश कार्यालयाकडून कळविण्यात आल्यानंतर सदर कार्यकारिणी शिंदे व वंडार पाटील यांनी मंगळवारी पक्षाच्या बैठकीत घोषित केली. त्यानुसार २५ उपाध्यक्ष जाहीर करण्यात आले. यात अॅड. प्रल्हाद भिलारे, विनायक काळण, शशिकांत म्हात्रे, रामदास वळसे-पाटील आदींचा समावेश आहे. सरचिटणीस पदी १३ जणांची घोषणा करण्यात आली असून यात माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, सुभाष गायकवाड, मनोज नायर, प्रविण मुसळे, प्रदीप जगताप आदींचा समावेश आहे. सचिवपदी प्रशांत माळी, भास्कर कडू, विनया पाटील, विजय चव्हाण या चौघांचा समावेश आहे. वसंत पाटील, विजय विसपुते यांची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

तसेच कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी माजी अध्यक्ष संदीप देसाई यांची दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष पदी अर्जुन नायर, कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्षपदी दत्ता वझे, यांची तर डोंबिवली विधानसभा अध्यक्षपदी माजी नगरसेवक सुरेश जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन गतवर्षी नोव्हेंबरमध्ये पक्षाच्या कल्याण जिल्हा अध्यक्ष व कार्याध्यक्ष नियुक्त करण्यात आले होते. मात्र त्यांच्या नियुक्तीनंतर तब्बल चार महिन्यांनी जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आल्याने या धीम्या कामकाजाबद्दल पक्षातीलच कार्यकर्त्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.