कल्याण-डोंबिवलीत शिवसैनिकांसह राष्ट्रवादी-काँग्रेसचा जल्लोष

कल्याण-डोंबिवलीत शिवसैनिकांसह राष्ट्रवादी-काँग्रेसचा जल्लोष

कल्याण (प्रतिनिधी) :

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करताच कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी, तर डोंबिवलीतील शेकडो राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंदिरा चौकात एकत्र जमून फटाक्यांच्या आतिष बाजी करीत पुढे वाटून जल्लोष साजरा केला.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी संध्याकाळी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर डोंबिवलीमधील शिवसैनिकांनी शिवसेना मध्यवर्ती शाखेसमोर, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंदिरा चौकात जमून एकच जल्लोष केला. शिवसेना शहर मध्यवर्ती शाखेने मानपाडा रोडला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नागरिकांसह शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. इंदिरा चौकात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके वाजवत पेढे वाटले आणि ढोल-ताश्याच्या तालावर नाचून आनंद व्यक्त केला.

दुसरीकडे कल्याणमधील शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. कल्याण शिवसेना शहर शाखेने कल्याण पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती. या स्क्रीनवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. नागरिकांसह शिवसेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी हा सोहळा पाहण्यास चौकात एकच गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच उपस्थित शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके वाजवत पेढे वाटले आणि ढोल-ताश्याच्या तालावर नाचून आनंद व्यक्त केला.