कल्याणमधील वसतिगृहाच्या अपूर्ण कामाकडे राष्ट्रवादीने वेधले बांधकाम विभागाचे लक्ष 

कल्याणमधील वसतिगृहाच्या अपूर्ण कामाकडे राष्ट्रवादीने वेधले बांधकाम विभागाचे लक्ष 

कल्याण (प्रतिनिधी) : शहरातील गौरीपाडा येथे महाराष्ट्रातील मुला-मुलींसाठी असलेल्या वसतिगृहाच्या अपूर्ण असलेल्या कामाकडे राष्ट्रवादीच्या अर्बन सेलचे प्रदेश सदस्य प्रविण मुसळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे. याप्रकरणी त्यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनिता परदेशी यांची भेट घेतली असता परदेशी यांनी सबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून अपूर्ण काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील मुला-मुलींसाठी असलेल्या वसतिगृहाचे काम मोठा गाजावाजा करीत सुरु करण्यात आले होते. मात्र काही महिन्यांपासून या वसतिगृहाचे काम अपूर्ण असल्याने त्याचा गरजू मुला-मुलींना उपयोग होत नव्हता. ही बाब निदर्शनास येताच मुसळे यांनी नुकतीच ठाणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनिता परदेशी यांची भेट घेतली व या महत्वाच्या बाबीकडे त्यांचे लक्ष वेधले. परदेशी यांनी कल्याण येथील संबंधीत शाखा अभियंता प्रशांतकुमार मानकर यांच्याशी फोनवरुन संपर्क साधून तातडीने वसतिगृहाचे अपूर्ण असलेले काम पुर्ण करण्याबाबत निर्देश दिले.