इंधनदरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने दिला मोदींना महागाईचा चषक भेट

इंधनदरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने दिला मोदींना महागाईचा चषक भेट

कल्याण (प्रतिनिधी) : इंधन दरवाढीबाबत वारंवार निवेदने देऊन देखील केंद्र सरकारला कोणताही फरक पडत नसल्याने नुकतेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने इंधनदरवाढीच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींना महागाईचा चषक भेट दिला आहे. महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आक्रमक झाली असून कल्याणमध्ये राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढत आपला निषेध व्यक्त केला आहे. 

वाढती महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आले. मात्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाई कमी होण्याऐवजी पेट्रोल, डीझेल, गॅस सिलेंडर यांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. पेट्रोल आणि डीझेलच्या दरांनी शंभरी पार केली असून घरगुती गॅस सिलेंडर देखील एक हजारच्या घरात पोहोचले आहे. या सर्वामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे चांगलेच मोडले असून वाढत्या महागाईत घर कसे चालवावे हा प्रश्न गृहिणींना पडला आहे. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बंद असून कोरोना आणि महागाई यामुळे जनता त्रस्त झाली आहे.

कल्याणमध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली नुकतेच आंदोलन करण्यात आले. कल्याण पश्चिमेतील राष्ट्रवादी जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथून निघालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड येथून तहसीलदार कार्यालयावर धडकला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालया बाहेर ठिय्या मांडत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यासाठी तहसीलदारांना महागाईचा चषक देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, माजी नगरसेवक सुरेश जोशी, प्रकाश तरे, संदीप देसाई, पांडुरंग चव्हाण, योगेश माळी, प्रशांत नगरकर आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.    

दररोज वाढणाऱ्या इंधनाच्या किमतींबाबत केंद्र सरकारला वारंवार निवेदने देऊन देखील फरक पडत नसल्याने आणि याची दखल घेतली जात नसल्याने तहसीलदारांमार्फत मोदींना महागाईचा चषक भेट म्हणून देण्यात आला आहे. हे सरकार लोकशाही सरकार नसून हुकुमशाह सरकार असल्याने इंधन दरवाढ केली जात आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलनाला बसले आहेत त्यांना चिरडण्याचं काम सरकार करत आहे. जोपर्यंत महागाई कमी होऊन जनतेला दिलासा मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिला आहे.