कल्याण पश्चिम जिंकण्यासाठी शिवसेनेच्या 'वाघा'वर राष्ट्रवादीचे जाळे

कल्याण पश्चिम जिंकण्यासाठी शिवसेनेच्या 'वाघा'वर राष्ट्रवादीचे जाळे

कल्याण (प्रतिनिधी) : 
ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ताकदवान नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाईक गटाकडून ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अधिकाधिक पदाधिकाऱ्यांना सोबत नेण्यासाठी जोरदार ‘संपर्क मोहीम’ राबविली जात आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिम विधानसभा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीने शिवसेनेच्या दांडगा जनसंपर्क असलेल्या ‘वाघा’ला आपल्या गोटात ओढण्यासाठी जाळे टाकले आहे. त्यांचा प्रयत्न यशस्वी झाल्यास कल्याण राष्ट्रवादीमध्ये चैतन्य पसरेल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला आहे.

एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाताहत होत असताना विधानसभा निवडणुकीत कल्याणमधील दोन्ही जागा ताकदीने लढविण्याची तयारी राष्ट्रवादीने चालविली आहे. त्यासाठी कल्याण पूर्वेतून राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील सदस्य आ. जगन्नाथ शिंदे यांचे नाव निश्चित मानले जात असून, कल्याण पश्चीमेतून विद्यमान जिल्हा अध्यक्ष रमेश हनुमते यांना उमेदवारी मिळणार असल्याचे प्राथमिक संकेत आहेत. मात्र हनुमंते यांच्यापेक्षा कल्याण पश्चिमेतील शिवसेनेच्या एका ‘वजनदार’ पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादीत घेऊन विधानसभेची उमेदवारी दिल्यास पक्षाची ताकद वाढून महापालिका निवडणुकीत त्याचा मोठा फायदा पक्षाला होईल अशी गणिते मांडली जात आहेत. यासाठी राष्ट्रवादीमधील एक गट कामाला लागला असून राष्ट्रवादीला लागलेली गळती रोखण्यासाठी देखील या प्रवेशाची स्थानिक पातळीवर मदत होईल असा होरा आहे. 

राष्ट्रवादीमधील एका गटाने सेनेच्या ‘त्या’ वजनदार पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादीत ओढण्यासाठी गळ टाकला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाशी देखील संपर्क करण्यात येत आहे. वरून हिरवा सिग्नल मिळाल्यास सेनेच्या ‘वाघा’चा राष्ट्रवादी प्रवेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होण्याचे प्राथमिक संकेत आहेत. या घडामोडीमुळे राष्ट्रवादीची ताकद वाढून जिल्हा नेतृत्वाला महापालिका निवडणुकीची तयारी देखील करणे शक्य होण्याचा अंदाज राष्ट्रवादीच्या गोटातून वर्तविण्यात येत आहे. या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा स्वरूपाचे काही प्रयत्न सुरु आहेत, मात्र त्याबाबत आताच काही बोलणे योग्य नसल्याने सांगण्यात आले आहे.