केडीएमसीच्या निवडणुकीत २ आकडा वाढविण्यासाठी राष्ट्रवादीची कसोटी!

केडीएमसीच्या निवडणुकीत २ आकडा वाढविण्यासाठी राष्ट्रवादीची कसोटी!

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचे विद्यमान जिल्हा अध्यक्ष रमेश हनुमंते यांच्यावर पक्षांतर्गत कार्यकर्त्यांकडून मागविण्यात आलेल्या अभिप्राय अभियानात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आल्याने त्याची पक्ष नेतृत्वाकडून गंभीर दखल घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुका पाहता हनुमंते यांना हटवून त्यांच्या जागी सक्षम जिल्हा अध्यक्ष देण्याच्या हालचाली पक्षातील स्थानिक धुरिणांनी सुरु केल्या आहेत.

हनुमंते हे दोन टर्म कल्याण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या रूपाने एका सामान्य प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या प्रयत्नात पक्ष संघटना मात्र दुबळीच राहिली. यामुळेच पक्षाने घेतलेल्या अभिप्राय अभियानात हनुमंते यांच्याबद्दल कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात विरोधात अभिप्राय नोंदवला आहे. याची पक्ष नेतृत्वाने गंभीर दखल घेतल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. नव्या जिल्हा अध्यक्षाचा शोधही सुरु झाल्याचे वृत्त आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेची येऊ घातलेली निवडणुक पाहता नगरसेवकांचा २ हा आकडा वाढवायचा असल्यास सक्षम जिल्हा अध्यक्ष देण्यासाठी राष्ट्रवादीची कसोटी लागणार आहे.

नविन जिल्हा अध्यक्ष पदासाठी पक्षातील इच्छुकांची काही नावे पुढे आली असून त्यामध्ये माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, विद्यमान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुधीर वंडार पाटील, डोंबिवली विधानसभेचे माजी अध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे, कल्याण पश्चिम विधानसभेचे माजी अध्यक्ष संदीप देसाई, पक्षाच्या वक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कोकण विभाग अध्यक्ष सुभाष गायकवाड यांचा समावेश आहे. दरम्यान, शहरातील राष्ट्रवादीचे बडे प्रस्थ असलेले माजी आमदार जगन्नाथ शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश प्रतिनिधी वंडार पाटील यांची भूमिका नविन जिल्हा अध्यक्ष निवडीत महत्वाची मानली जात आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील पक्षाचा आणखी एका मोठ्या नेत्याची भूमिका देखील जिल्हाध्यक्ष निवडीसाठी महत्वाची मानली जात आहे. मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये पक्ष संघटन बांधण्याचे कौशल्य असलेल्या कार्यकर्त्याची जिल्हा अध्यक्षपदी निवड होण्याची गरज असल्याचे मत पक्षातील जुने कार्यकर्ते-पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.