पालघरात भूकंपापासून होणारी हानी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना

पालघरात भूकंपापासून होणारी हानी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना

मुंबई ( प्रतिनिधी) :
पालघर जिल्ह्यात जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांपासून होणारी जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय भेगडे यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली. पालघर जिल्ह्यात भूकंपाच्या मोठ्या व मध्यम धक्क्याने सुरक्षिततेचा निर्माण झालेला प्रश्न, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरु नये यासाठी करावयाच्या उपायोजनांबाबत लक्षवेधी सूचना आ. आनंद ठाकूर यांनी मांडली होती, त्याला उत्तर देताना ना. भेगडे बोलत होते.

भेगडे पुढे म्हणाले की, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत ‘भूकंप सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाय’ सीएसआयआर, नवी दिल्ली यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या दहा हजार प्रती भूकंप प्रवण क्षेत्रातील सर्व विद्यार्थी व घरोघरी वाटप करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यात बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच स्थानिक जनतेच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या भितीचे वातावरण निर्माण होऊ नये, म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती कार्यक्रम शालेय स्तरावरुन गावागावातील नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणात राबविण्यात आलेला आहे व यापूढेही राबविण्यात येणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवणार नाही यासाठी एनडीआरएफ, सिव्हील डिफेन्समार्फत प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांच्या अनुषंगाने शासन जनजागृती व प्रशिक्षणाबाबत अग्रक्रमाने कार्यवाही करत आहे. तसेच जिल्ह्यातील अणुऊर्जा प्रकल्पाला भूकंपरोधक बांधकाम केले असल्याची माहिती ना. भेगडे यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत आ. रवींद्र फाटक, आ. विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला.