स्‍वच्‍छ-सुंदर कल्याण डोंबिवली हे नव्या आयुक्तांचे लक्ष्य!

स्‍वच्‍छ-सुंदर कल्याण डोंबिवली हे नव्या आयुक्तांचे लक्ष्य!

कल्याण (प्रतिनिधी) :
शहराचे प्रश्न वाहतूक, कचरा, डंपिंग ग्राउंड, स्मार्ट सिटीची प्रगती अशा सर्व विषयांचा आठवड्याभरात अभ्यास करून पुढील कामकाजाची दिशा ठरविणार असल्याचे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडून त्यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्या दोघांनी पत्रकारांशी संवाद साधला.

याप्रसंगी सूर्यवंशी पुढे म्हणाले की, मुंबई मेट्रोपोलीटन रिजनमध्ये कल्याण डोंबिवली महापालिका येत असल्याने विकास गतीने होत असून त्या दृष्टीने शहरात पायाभूत सुविधा या उपलब्ध करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. शहरातील विकास कामांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगत कचरा मोठ्या प्रमाणात साठत आहे. यावर स्वच्छ भारत कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याची गरज डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

आपले शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी ‘कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका सुंदर, स्‍वच्‍छ, नगरी, महापालिकेचे एकच लक्ष’ हेच उदि्दष्‍टय बाळगून काम करणार आहोत. मागील आयुक्तांच्या काळातील प्रकल्प-उपक्रम पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू. यासाठी येथील लोकप्रतिनिधी, नागरिक व प्रशासनातील सहकारीवर्ग यांच्या सहकार्याने प्रयत्न करू असेही नवनियुक्त आयुक्त म्हणाले. कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेत रुजू होण्‍यापूर्वी डॉ. विजय सुर्यवंशी हे जिल्‍हाधिकारी रायगड या पदावर कार्यरत होते. 

आयुक्तांनी केली आधारवाडी क्षेपणभूमीची पाहणी 

आयुक्‍तपदाचा पदभार स्विकारल्‍यावर आयुक्‍त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी लगेच आधारवाडी क्षेपणभूमीला भेट देवून पहाणी केली. त्यांच्या समवेत घनकचरा विभागाचे उपायुक्‍त उमाकांत गायकवाड, कार्यकारी अभियंता घनश्‍याम नवांगुळ, सहा. आयुक्‍त गणेश बोराडे, सहा. सार्वजनिक आरोग्‍य अधिकारी अगस्तिन गुटे उपस्थित होते. यावेळी १ मे २०२० रोजी आधारवाडी क्षेपणभूमी बंद करण्‍याच्‍या अनुषंगाने, तसेच तेथे असलेल्‍या कच-याचे बायोमायनिंग करण्‍याच्‍या दृष्टीकोनातून नियोजन करण्याच्या दृष्टीने आयुक्त सूर्यवंशी यांनी सबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्याचप्रमाणे क्षेपणभूमीवर जंतूनाशक, दुर्गंधीनाशक, फवारणी योग्‍य प्रमाणात करुन दुर्गंधी येणार नाही याचीही खबरदारी घेण्यासंदर्भातही त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.