कडोंमपा रुग्णालयातील नवमातांना मिळणार ‘डॉ. आनंदीबाई जोशी माता कीट’

कडोंमपा रुग्णालयातील नवमातांना मिळणार ‘डॉ. आनंदीबाई जोशी माता कीट’

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण डोंबिवली महापालिका रुग्णालयातील नवमाता व नवजात बालकांना ‘डॉ. आनंदीबाई जोशी माता कीट’ देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते आज करण्यात आला. कल्याण येथील महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील नवमातांना हे कीट वितरीत करण्यात आले.

यावेळी महिला व बालकल्याण, झोपडपट्टी सुधारणा समितीच्या सभापती रेखा राजन चौधरी, ‘क’ प्रभाग समितीच्या सभापती शकीला गुलाम दस्तगीर खान, मनसेच्या नगरसेविका सुनंदा मुकुंद कोट, सहाय्यक आयुक्त मिलिंद धाट, वैद्यकीय आरोग्य अधिकारी लवंगारे, रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, महापालिकेचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. महापालिका रुग्णालये व प्रसूतीगृहांमध्ये बहुतांशी आर्थिकदृष्ट्या गरीब स्तरातील गरोदर महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. मात्र नवबालकांना पोषक वस्तू तातडीने घेणे त्यांना अनेकदा शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेता महापालिकेच्या महिला व बालकल्याण, झोपडपट्टी सुधारणा समितीने माता कीट देण्याचा निर्णय घेतला होता. 

नवमाता व त्यांच्या बालकांना देण्यात येणाऱ्या या कीटचे (संच) डॉ. आनंदीबाई जोशी नवमाता कीट असे नाव देण्यात आल्याची माहिती सभापती रेखा चौधरी यांनी दिली. या कीटमध्ये नवजात बालकांसाठी झबला-नॅपी-कॅप प्रत्येकी ४, बेबी कव्हरिंग ब्लंकेट, विंटर सेट, दुपटे, टॉवेल, बेबी लोशन, बेबी मसाज ऑईल, फीडिंग बॉटल, सोप, पावडर, नेल कटर, गादी तर त्यांच्या मातांसाठी ब्रेस्ट फीडिंग गाऊन इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. महापालिकेच्या कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालय, डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालय व प्रसूतिगृहातील प्रत्येक नवमातांना हा कीट दिला जाणार आहे. असा कीट देणारी कल्याण डोंबिवली ही पहिलीच महापालिका असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.