कोकणात नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प नको

कोकणात नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प नको

मुंबई (प्रतिनिधी) :
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न शासन स्तरावर सुरु असताना, हा प्रकल्प कोकणातील पर्यावरणाला घातक असल्याचे सांगत पर्यावरणवादी कोकणी जनतेने हा प्रकल्प नाणार येथे उभारण्यास विरोध केला. ‘कोकणच्या निसर्गाचा विनाश होऊ देऊ नका’, असे त्यांचे म्हणणे आहे. परिणामी शासनाने सदर प्रकल्प नाणार येथे उभारण्याचा निर्णय रद्द केला. दरम्यान, सदरचा प्रकल्प नाणार येथेच झाला पाहिजे, अशी मागणी करीत मागील महिन्यात रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास समितीच्या पुढाकाराने मोर्चा नेण्यात आला. या पार्श्वभूमीवर ‘कोंकण वृत्तांत’ न्यूज पोर्टलने एका पोलच्या माध्यमातून या विषयावर आपल्या व्ह्युवर्सचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या पोलमध्ये एकूण ३११ व्ह्युवर्सनी मत दिले. त्यापैकी ४६.६ टक्के व्ह्युवर्सनी ‘कोकणात नाणार प्रकल्प व्हावा’, या बाजूने मत व्यक्त केले, तर त्यापेक्षा अधिक म्हणजे ५२.४ टक्के व्ह्युवर्सनी ‘कोकणात नाणार प्रकल्प नको’, या बाजूने कौल दिला आहे.

कोकणचा विकास आणि कोकणी माणसाची भूमिका मांडण्याचा ‘कोंकण वृत्तांत’चा प्रयत्न आहे. या अनुषंगाने ‘कोकणचा कौल’च्या (पोल) माध्यमातून आपल्या व्ह्युवर्सची विविध विषयांवर मते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यापुढेही कोकणच्या दृष्टीने महत्वाच्या विषयांवर आपल्या व्ह्युवर्सची मते अर्थात ‘कोकणचा कौल’ या पोलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कोकणच्या विकासाची नांदी गात नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न शासन स्तरावर करण्यात आला. सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आदींच्या सहाय्याने आकारास येणारा हा सुमारे तीन लाख कोटींचा भव्य तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्य़ात राजापूर तालुक्यातील नाणारमध्ये उभारण्यात येणार होता. परंतु पर्यावरणवादी कोकणी जनतेने हा प्रकल्प नाणार येथे उभारण्यास कडाडून विरोध केला. शिवसेनेने देखील नाणारला विरोध करीत आपण कोकणी जनतेच्या बाजूने उभे असल्याची भूमिका घेतली. महत्वाचे म्हणजे भाजपबरोबर युती करताना सेनेने हा प्रकल्प रद्द करण्याची अट घातली होती.

नाणार प्रकल्पामुळे कोकणातील फळबागा, निसर्गाची हानी होण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिकांचा या प्रकल्पाला मोठा विरोध दर्शविला. दरम्यान, विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याची माहिती दिली होती. त्यांनतर मागील महिन्यात सदरचा प्रकल्प नाणार येथेच झाला पाहिजे, अशी मागणी करीत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास समितीच्या पुढाकाराने मोर्चा नेण्यात आला. अशा पार्श्वभूमीवर ‘कोकण वृत्तांत’ने आपल्या व्ह्युवर्सचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 'कोकणचा कौल' या नावाने ‘कोकणात नाणार प्रकल्प हवाय का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. या पोलमध्ये एकूण ३११ व्ह्युवर्सनी आपले मत दिले. त्यापैकी ४६.६ टक्के व्ह्युवर्सनी ‘कोकणात नाणार प्रकल्प व्हावा’, असे मत व्यक्त केले तर त्यापेक्षा अधिक ५२.४ टक्के व्ह्युवर्सनी ‘कोकणात नाणार प्रकल्प नको’ असल्याचे सांगत आपला विरोध दर्शविला आहे. १ टक्के व्ह्युवर्सनी ‘सांगता येत नाही’ या बाजूने आपले मत दिले.