मराठी भाषेच्या संवर्धन, समृद्धतेसाठी निधीची कमतरता नाही - मुख्यमंत्री 

मराठी भाषेच्या संवर्धन, समृद्धतेसाठी निधीची कमतरता नाही - मुख्यमंत्री 

मुंबई (प्रतिनिधी) : 
डिजिटल शाळा, नाविन्यपूर्ण उपक्रमातून आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे. मराठी नुसती टिकवायची नाही, तर वाढली पाहिजे, अधिक समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही, अशी  नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. ‘मराठीच्या भल्यासाठी-मराठीचे व्यासपीठ’अंतर्गत एकत्र आलेल्या चोवीस संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने सोमवारी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 

सदर शिष्टमंडळात ज्येष्ठ साहित्य‍िक मधु मंगेश कर्णिक, लक्ष्मीकांत देशमुख, कौतिकराव ठाले-पाटील, नागनाथ कोतापल्ले, दादा गोरे, अभिनेत्री वर्षा उसगावकर आदींचा समावेश होता. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, अन्य राज्यांतील प्रादेशिक भाषांच्या शाळांवरील खर्चाच्या तुलनेत महाराष्ट्र अनुदानित मराठी शाळांवर सर्वाधिक खर्च करणारे राज्य आहे. डिजिटल शाळा, नाविन्यपूर्ण उपक्रमातून आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे. इंग्रजी माध्यमासह अन्य शाळांमध्ये गेलेली मुले या उपक्रमामुळे मराठी शाळांमध्ये परतली आहेत. राज्याकडे शालेय शिक्षणासाठी संसाधनांची कोणत्याही प्रकारची कमतरता नाही आणि यापुढेही ती भासू दिली जाणार नाही. पण त्याचबरोबर शाळांतील गुणवत्ता वाढीसाठी आणि ती टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मराठी नुसती टिकवायची नाही, तर वाढली पाहिजे, अधिक समृद्ध व्हावी यासाठी कालबद्धरित्या असे प्रयत्न केले जातील. मराठी भाषा विकासासाठी कराव्या लागणाऱ्या कायद्यांबाबत सकारात्मक असेच प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी मराठी भाषा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे म्हणाले, ‘मराठी भाषा संवर्धनासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. मराठी भाषा संवर्धनाच्या चळवळीत सहभाग वाढावा अशीच अपेक्षा आहे. मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी या सर्वांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यासाठी सर्व घटकांचे स्वागतच आहे.’

यावेळी झालेल्या चर्चेत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा सक्ती, मराठी शिक्षण कायदा, मराठी भाषेसाठी अभिजात दर्जा, मराठी भाषा भवन, मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना, वाचनसंस्कृती वाढीसाठीचे प्रयत्न याबाबतही चर्चा झाली. शिष्टमंडळाने मराठी भाषा सक्तीच्या धोरणाचे स्वागत करून, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, आमदार नीलम गोऱ्हे,मनीषा कायंदे, मेधा कुलकर्णी, हेमंत टकले, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.