जलवाहिनीमुळे रस्त्याचे काम रखडल्याने अटाळीकरांमध्ये संताप 

जलवाहिनीमुळे रस्त्याचे काम रखडल्याने अटाळीकरांमध्ये संताप 

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण जवळील अटाळी येथील एका रस्त्याचे काम खालून जलवाहिनी जात असल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर टाकलेल्या खडींवरून अडखळत चालण्याची वेळ आल्याने अटाळीकरांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी अटाळी गावातील भोईर कंपाउंड ते काळू नदीपर्यंत शंभर मीटरच्या रस्ता कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ कल्याण पश्चिमेचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला होता. या कामासाठी आमदार निधीतून २० लाखाची तरतूद करण्यात आली होती. रस्त्याचे हे काम गेल्या दोन महिन्यांपासून अर्ध्यावर बंद पडल्याने निव्वळ खडी टाकलेल्या रस्त्यावरून नागरिकांना अडखळत चालण्याची वेळ आल्याने गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

सदर रस्त्यावर सर्वत्र खडी पसरल्याने नागरिकांना त्यावरुन चालणे अवघड होऊन बसले आहे. त्यातच दगडांची सोलिंग तसेच पीसीसी ही केलेली नाही. या रस्त्यांवरून दररोज हजारो नागरिक प्रवास करीत आहेत नांदकर व अन्य बाजूच्या गावातील लोक नदीकिनाऱ्यावर होडीमार्गे जात असतात. मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड खडी टाकल्याने आबालवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना चालणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कॉंक्रिटीकरण असणाऱ्या या रस्त्यांवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची पाणी पुरवण्याची लाईन असून तर विद्युत महावितरण कंपनीची केबल देखील गेल्याने संबंधित ठेकेदाराने संबंधित विभागांकडे परवानगी घेतलेली नसल्याचे समोर आले असून परिणामी हे काम अर्ध्यावर थांबले आहे.

रस्त्यांच्या ज्या ठिकाणाहून पाणी पुरवण्याची लाईन तसेच महावितरण कंपनीची केबल गेली त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकून उर्वरित रस्ता कॉंक्रिटीकरण केले जाणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता सुनील वैद्य यांनी सांगितले. सदर रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम घेणाऱ्या ठेकेदाराने पाणीपुरवठा विभाग व महावितरण कंपनीला कुठलीच सूचना न दिल्याने या रस्त्याचे काम अडकल्याचे येथील मनसेचे पदाधिकारी दिनेश पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या २० लाख रुपयांचा निधी पेव्हर ब्लॉकसाठी खर्च केला जाणार असल्याने सदर कामाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पाण्याची लाईन व विद्युत महावितरणची केबल शिफ्ट केल्यास संपूर्ण रस्ता कॉंक्रिटीकरण होऊ शकतो. मात्र बांधकाम विभाग याकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे. अर्धा रस्ता पेवर ब्लॉकचा तर अर्धा रस्ता डांबरीकरणाचा केला गेल्यास असा रस्ता टिकेल का, असा सवाल  ग्रामस्थांकडून केला जात आहे.