कल्याण-डोंबिवलीत विधानसभेच्या ८९ अर्जांपैकी ६४ अर्ज वैध

कल्याण-डोंबिवलीत विधानसभेच्या ८९ अर्जांपैकी ६४ अर्ज वैध

कल्याण (प्रतिनिधी) : 
कल्याण तालुक्यामधील कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली या चारही विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी ७४ उमेदवारांनी ८९ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आज छाननीअंती ६४ उमेदवरांचे अर्ज वैध ठरले आहेत. सोमवार ७ ऑक्टोंबरला अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. यावेळी उमेदवारांनी मागे घेतलेल्या अर्जानंतरच या चार प्रभागात एकूण किती उमेदवार रिंगणात असतील तसेच ही लढत चुरशीची होणार हे स्पष्ट होईल.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात शुक्रवारी २४ उमेदवारांनी ३२ अर्ज दाखल केले. छाननीअंती २२ उमेदवार वैध ठरले असून संभाजी ब्रिगेड, कॉंग्रेस आणि २ अपक्ष अशा ४ महिला उमेदवार यात आहेत. कल्याण पूर्वे विधानसभा मतदार संघात २० उमेदवारांनी २३ अर्ज दाखल केले होते. छाननीअंती २० उमेदवारी अर्ज वैध झाले असून वंचित बहुजन आघाडी आणि २ अपक्ष अशा ३ महिला उमेदवार रिंगणात आहेत. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात २२ उमेदवारांनी २६ अर्ज दाखल केले तर छाननीनंतर १६ अर्ज वैध ठरले आहेत. यात समाजवादी पक्षाच्या एकाच महिला उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केला आहे. डोंबिवली विधानसभा मतदार संघात ८ उमेदवारांनी ८ अर्ज दाखल केले असून यात ६ वैध ठरले. वंचित बहुजन आघाडी आणि कॉंग्रेस या पक्षातून २ महिलांनी अर्ज दाखल केले आहे.

दरम्यान, सोमवारी अर्ज मागे घेण्याची अतारीख असून यानंतरच निवडणुकीत कशाप्रकारे लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होईल.