केडीएमसीत सत्तारूढ भाजप विरोधी बाकावर

केडीएमसीत सत्तारूढ भाजप विरोधी बाकावर

कल्याण (प्रतिनिधी) : 
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, शिवसेना-भाजप युतीत दरार निर्माण झाली होती. मात्र तरीसुद्धा केडीएमसीत सेना भाजप युतीची सत्ता कायम होती. अखेर नुकत्याच झालेल्या महासभेत  भाजप अधिकृतपणे सत्तेतून बाहेर पडली. सर्वसाधारण सभेत महापौर विनिता राणे यांनी विरोधी पक्षनेतेपदी भाजपचे राहुल दामले यांच्या नावाची घोषणा केली. तब्बल २० वर्षानंतर  केडीएमसीत शिवसेना भाजपचा घटस्फोट झाला आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर, कल्याण डोंबिवलीतही त्याचे पडसाद उमटू लागले आहे. मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत भाजपने विरोधी बाकावर बसण्यासाठी महापौरांकडे प्रस्ताव दिला होता. त्यानुसार विरोधी पक्षनेते म्हणून राहूल दामले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपच्या गटनेतेपदी शैलेश धात्रक तर राष्ट्रवादी काँग्रेस गटनेतापदी संतोष तरे यांच्या नियुक्तीची घोषणा महापौरांनी केली. काही दिवसांपूर्वीच भाजपने उपमहापौर पदाचा राजीनामा दिला होता. स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीतही भाजपने मनसे, काँग्रेसची साथ घेत सेनेचा पराभव केला होता.

सोमवारी आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रशासनावर तोफ डागीत सेनेला अप्रत्यक्ष इशारा दिला होता. या घडामोडीनंतर मंगळवारी भाजपने अधिकृतपणे विरोधी बाकावर बसण्याची भूमिका घेतल्याने सेना भाजप युती तुटली आहे. मात्र महापौरांनी विरोधी पक्षनेतेपदी दामले यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी आक्षेप घेतला. शिवसेना सत्तेत आली तेव्हा भाजपने अनुमोदन दिले होते. मग आता विरोधात कशी बसणार ? हे नियमाला धरून नाही. सभागृह विरुद्ध दिशेने चाललंय, असा आरोप केला. 

१९९५ साली कल्याण डोंबिवलीची महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात सेना भाजप युतीची सत्ता असताना केडीएमसीत भाजप विरोधी पक्षात होती. त्यानंतर अडीच वर्षांचा कार्यकाल सोडल्यास शिवसेना भाजप सत्तेत होती. अखेर दोघांचा महापालिकेतही काडीमोड झाला.

पक्षीय बलाबल 


शिवसेना- ५२
भाजप- ४२
मनसे- ९
काँग्रेस- ४
राष्ट्रवादी- २
अपक्ष- ११  

बसपा - १

एमआयएम- १ 

सेना-भाजप वादाचा मनसेला फटका 

महापालिकेत शिवसेना भाजप सत्तेत असल्याने विरोधी पक्ष नेतेपद हे मनसेकडे होते. मात्र सेना भाजपच्या वादात मनसेला फटका पडला असून, मनसेला विरोधी पक्षनेते पद गमवावे लागले आहे.