वन महोत्सवात सवलतीच्या दराने रोपे - वनमंत्री

वन महोत्सवात सवलतीच्या दराने रोपे - वनमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : 
राज्यात दि. १५ जून ते ३० सप्टेंबर या वनमहोत्सवाच्या काळात वृक्षप्रेमींना वृक्ष लागवडीसाठी सवलतीच्या दराने रोपे उपलब्ध करून देण्याचा निर्णय वन विभागाने घेतला असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली. ते म्हणाले, ९ महिन्याचे लहान पिशवीतील रोप जे इतरवेळी १५ रुपयांना विकले जाते ते वन महोत्सवाच्या काळात ८ रुपयांना विकण्यात येईल. तसेच १८ महिन्यांचे मोठ्या पिशवीतील रोप जे इतर वेळी ७५ रुपयांना विकले जाते ते वनमहोत्सवाच्या काळात ४० रुपयांना मिळू शकेल.

सामाजिक वनीकरण विभागामार्फत तुतीची रोपे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तयार करून ती रेशीम संचालनालयास मोफत उपलब्ध करून दिली जातील. रेशीम संचालनालयामार्फत या रोपांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जाईल.

राज्यात या पावसाळ्यात लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प आहे. यात विविध शासकीय विभाग, यंत्रणांनीही सहभाग घेतला आहे. अधिकाधिक व्यक्ती, संस्था, शेतकरी यांना वृक्षलागवड कार्यक्रमात सहभाग घेता यावा, म्हणून वन विभागाने सवलतीच्या दराने रोपे पुरवण्याचा निर्णय घेतला असल्याचेही वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.