डोंबिवलीत फडकणार दीडशे फुट उंच तिरंगा!

डोंबिवलीत फडकणार दीडशे फुट उंच तिरंगा!

डोंबिवली (प्रतिनिधी) : डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर चौक येथील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर उद्यान येथे उभारण्यात येणाऱ्या १५० फुट उत्तुंग भारतीय तिरंगा ध्वजाच्या कामाचा भूमिपूजन सोहोळा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. लवकरच येथे तिरंगा ध्वज फडकताना पाहायला मिळणार असून याकरिता शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख तथा ज्येष्ठ नगरसेवक राजेश मोरे यांनी पुढाकार घेतला होता.

समस्त डोंबिवलीकरांच्या देशाभिमानाचे प्रतिक ठरेल अशा या ध्वज उभारणीच्या उदात्त स्वप्नाच्या पुर्ततेकरिता आज पहिले पाऊल उचलत सदर कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली विधानसभा संघटक तात्या माने, कार्यक्रमाचे आयोजक तथा डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, महिला आघाडी संघटक मंगला सुळे, नगरसेविका भारती राजेश मोरे, कविता गावंड आदी मान्यवर तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यातील उत्तुंग भारतीय तिरंगा ध्वज उभारण्यासाठी ज्येष्ठ नगरसेवक राजेश मोरे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश आल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.