कल्याण पश्चिम जिंकण्यासाठी एक लाख मतांचे लक्ष्य – अरविंद मोरे

कल्याण पश्चिम जिंकण्यासाठी एक लाख मतांचे लक्ष्य – अरविंद मोरे

कल्याण (प्रतिनिधी) : 
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी एक लाखांचे मतांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. येथून शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर एक लाखांपेक्षा अधिक मते मिळवून विजयी होतील, असा दावा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी व्यक्त केला आहे. भोईर यांच्या प्रचार दरम्यान बोलताना मोरे यांनी हा दावा केला आहे. 

मोरे यांनी यावेळी सांगितले की, गत लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार असलेले भाजपचे कपिल पाटील यांना कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून एक लाख १७ हजार मते मिळाली होती. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या ३८ प्रभागांपैकी २० प्रभागात शिवसेनेचे तर ६ प्रभागात सेना सहयोगी-अपक्ष नगरसेवक आहेत. या प्रत्येक प्रभागातून प्रत्येकी दोन हजार मते मिळविण्याचे लक्ष्य स्थानिक सेना नगरसेवक-पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. ज्या प्रभागात सेनेचे नगरसेवक नाहीत अशा प्रभागांची जबाबदारी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. अशाच पद्धतीने या सर्व प्रभागातून भाजप-रिपाईचे पदाधिकारी-कार्यकर्ते देखील देखील भोईर यांचा प्रचार करीत आहेत. सर्व स्तरावर महायुतीमधील घटक पक्ष समन्वयाने काम करीत आहेत. यामुळे घटक पक्षांकडून होणारी मदत लक्षात घेता महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना एक लाख मते मिळविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे मोरे यांनी सांगितले. 

भोईर यांना सर्व घटकातील मतदारांचा जोरदार पाठींबा मिळत आहे. त्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विरोधकांचे अनामतही जप्त होईल, असा दावा मोरे यांनी व्यक्त केला आहे. प्रभागनिहाय मतदान मिळविण्याची ही तयारी म्हणजे एक प्रकारे आगामी महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम देखील असेल, असे संकेतही मोरे यांनी स्पष्टपणे दिले आहेत.