नवीन दुर्गाडी पुलाच्या मार्गिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण

नवीन दुर्गाडी पुलाच्या मार्गिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण

कल्याण (प्रतिनिधी) : नवीन दुर्गाडी पुलाच्या मार्गिकेचे (दोन लेन) अखेर सोमवारी लोकार्पण करण्यात आले असून गेल्या काही वर्षापासून भेडसावणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास हातभार लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑनलाईन तर नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फित कापून सदर मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले. 

कल्याण-भिवंडी शहराला जोडणारा, तसेच ठाणे-मुंबईकडे जाण्यासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा मनाला जातो. कल्याण शहरासह आसपासच्या शहरातील हजारो नागरिक याचा वाहतुकीसाठी वापर करतात. गेल्या काही वर्षांपासून वाहतुकीसाठी वापरात असलेला पूल अपुरा पडत असल्याने तब्बल ६ वर्षांपूर्वी नव्या पुलाच्या बांधकामाला सुरवात झाली. अखेर सोमवारी या पुलाच्या दोन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या. त्यामुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी कामावर जाणाऱ्या येणाऱ्यांना करावी लागणारी तारेवरची कसरत आता थांबणार आहे.

जुना पूल बंद झाल्याने एकाच पुलावर वाहतूक आल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास आणि सहन करावा लागत होता. आज यापैकी नविन दोन मार्गिकांचे उद्घाटन झाले असून उरलेल्या चार मार्गिकांचे कामही लवकरच होणार असल्याचा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच येत्या काळात नागरिकांना ६ नविन आणि २ जुन्या अशा ८ मार्गिका नागरिकांना वापरायला मिळणार असल्याने मोठ्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार असल्याचेही शिंदे म्हणाले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे, महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, माजी आमदार नरेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या लोकार्पण सोहळ्यात सोशल डिस्टन्सचा चांगलाच फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी सकाळी पूलाचा पाहणी दौरा केला. यावेळी पूल बांधण्यासाठी परवानगी आणि निधी माझ्या कार्यकाळात मंजूर झाला. पुलाचे काम लवकरात लवकर सुरू होणेसाठी अनेकदा पत्रव्यवहार देखील केला. असे असताना देखील या उद्घाटन सोहळ्यात साधे निमंत्रण देखील दिले नसल्याने त्यांनी नाराजगी व्यक्त केली.