कोकणातील प्रलंबित पर्यटन विकास कामांना गती देण्याचे आदेश

कोकणातील प्रलंबित पर्यटन विकास कामांना गती देण्याचे आदेश

मुंबई (प्रतिनिधी) : 
कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत कोकणातील पर्यटनाला चालना देऊन विकास कामांना गती देण्यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी नुकतीच एक आढावा बैठक घेतली. प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन प्रलंबित पर्यटन विकास कामांची प्राधान्य यादी बनवून तत्काळ सादर करा व पर्यटन विकास कामांना गती द्या, असे निर्देश यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मंत्रालयात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर या जिल्ह्यातील पर्यटन विकास कामांमध्ये येणाऱ्या विविध समस्यांबद्दल बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार सर्वश्री भारत गोगावले, वैभव नाईक, उदय सामंत आदी उपस्थित होते.

कोकण ग्रामीण पर्यटन विकास कामांबद्दल अधिक माहिती देताना ग्रामविकास राज्यमंत्री भुसे म्हणाले की, पर्यटनाचा विकास होणाऱ्या गावांमध्ये पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी गावांतर्गत पोच रस्ते बांधणे यांसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने या कामांची यादी तात्काळ तयार करण्यात यावी. तसेच विकास कामांच्या निधीसाठी जिल्हानिहाय आराखडा तयार करण्यात यावा. त्याचबरोबर अखर्चित निधीच्या मुदत  वाढ प्रस्तावास तात्काळ मान्यता देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी ग्रामविकास विभागाचे उपसचिव मनोज जाधव यांच्यासह ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.