पालघर; हरणवाडी येथे पाण्याची टाकी कोसळली !

पालघर; हरणवाडी येथे पाण्याची टाकी कोसळली !

पालघर (पंडीत मसणे) : 
पालघर तालुक्यातील माहीम जवळील हरणवाडी या गावात ५-६ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची टाकी नुकतीच कोसळली. या घडनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी रहिवाशांना पाणी समस्येला तोंड देण्याची वेळ आली आहे. तसेच शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले ते वेगळेच.

गेल्या पाच-सहा वर्षीपुर्वी पालघर २६ गाव पाणीपुरवठा योजने योजना कार्यान्वित करण्यात आली होती. त्या अंतर्गत माहीम ग्रामपंचायतीच्या हरणवाडी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेली ८० हजार लिटर्स क्षमतेची पाण्याची टाकी दोन दिवसांपूर्वी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कोसळली. त्यावेळी जवळच उभे असलेले तीन लोक थोडक्यात बचावल्याची माहिती शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते नरेश केणी यांनी दिली आहे. 

अवघ्या काही वर्षांतच टाकीचे बांधकाम कोसळून पडल्याने सबंधित ठेकेदार यांचा बांधकामातील हलगर्जीपणा व शासकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. हरणवाडी गावात सुमारे दोनशेच्या आसपास घरे आहेत. येथील रहिवाशांना यामुळे पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. कोसळलेल्या या टाकीच्या खाली छोटी अंडर ग्राऊंड टाकी असल्याने त्यामधून तात्पुरती स्वरूपात पाणी पुरवठा होऊ शकेल. दरम्यान, सरपंच-उपसरपंच यांनी घटनास्थळाची पाहणी केली व परिस्थितीची माहिती सबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. अवघ्या ५-६ वर्षांपूर्वी ह्या टाकीचे बांधकाम करण्यात आल्याने निकृष्ट बांधकामामुळे ही टाकी कोसळल्याने ह्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उपसरपंच नरोत्तम राऊत यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत पाणी पुरवठा अधिकारी  यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.