सत्तेला शरण न गेलेला ‘पॅंथर’

सत्तेला शरण न गेलेला ‘पॅंथर’

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर चळवळीची विल्‍हेवाट लागली. प्रत्येक जण आपला स्वतःचा गट निर्माण करू लागला. सोळा वर्षानंतर प्रत्येक नेत्याने पद्धतशीरपणे आपल्या गटाचे दुकान स्थापित केले. गटबाजीचे राजकारण आणि सत्तेचे भागीदार कसे होऊ, याकडे प्रामुख्याने त्यांनी लक्ष केंद्रित केले; त्यासाठी सत्तेच्या मोहाला प्यासे झाले. महाराष्ट्रात त्याच काळात दलितांच्या दिवसाढवळ्या झोपड्या जळत होत्या, दर दिवशी कित्येक महिलांवर बलात्कार होत होते. शेकडोच्‍या संख्येने राजरोसपणे दलितांच्या हत्या होत होत्या. त्यावेळी समाजातील तरुणांमध्ये, ‘आपले नेतृत्व कुचकामी आहे’, ‘नेतृत्व असतानाही आपल्या बांधवांवर अन्याय सुरू आहे आणि हे सत्तेच्या मोहजाळात आणि गटबाजीत माजलेले आहेत’, ‘एकीकडे प्रचंड प्रमाणात मुस्कटदाबी होत असताना आपले नेतृत्व नपुसंक बनले आहे', अशी भावना पसरली... 

अखेरीस १९७२ च्या दरम्यान मुंबईतील काही सुशिक्षित तरुणांनी दलित नेतृत्वाला कंटाळून अमेरिकेतील ‘ब्लॅक पॅंथर’च्या धर्तीवर आपण ‘दलित पॅंथर’ का निर्माण करू नये यावर चर्चा सुरु केली. त्या चर्चेचे रुपांतर अखेर ‘दलित पॅंथर’ची स्थापना करण्यात झाले. ‘पॅंथर’चा उगम इतका झंझावाती होता की, त्याला रोखण्यात राज्य व केंद्र शासन देखील अपयशी ठरले. त्यावेळी ‘पॅंथर’चे नेतृत्व राजाभाऊ ढाले, नामदेव ढसाळ, ज.वि पवार, भाई संगारे, अविनाश महातेकर व अन्य पॅंथर्सनी केले.

पॅंथर इतकी जहाल संघटना होती की, महाराष्ट्रात ज्या ठिकाणी दलितांवर अन्याय अत्याचार होत असे, त्या ठिकाणी मुंबईहून पॅंथर्स झुंडीने जाऊन गावकऱ्यांना व जातीयवाद्यांना जशास तसे उत्तर देत असत. महाराष्ट्रात शिवसेना जशी जोमाने काम करत होती, तितक्याच जहाल आक्रमकतेने प्रतिस्पर्धी म्हणून ‘दलित पॅंथर’ ताकदीने सक्रीय होती. त्यामुळे महाराष्ट्रातील दलितांना ‘दलित पॅंथर’ आपली हक्काची संघटना वाटू लागली, त्याचे श्रेय नक्कीच राजा ढाले यांना जाते. 'हम किसीसे कम नही' या धर्तीवर विरोधकांना मुहतोड जवाब द्यायला पॅंथर्स मागेपुढे पाहत नव्हती. प्रश्न कुठला आणि कसाही असो, स्तंभलेखन असो, अन्याय-अत्याचाराचा असो, किंवा जाळपोळीचा असो, राजा ढाले आपल्या वैचारिक लिखाणातून मुद्देसूद व परखड विचार मांडत असत.

मोरारजी देसाई यांनी त्याकाळी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते की, ‘तुम्हाला कोणी बुद्ध धर्म स्वीकारायला सांगितला होता?’. धर्मांतर करण्यास मोरारजी विरोध करताहेत, हा मुद्दा पकडून पॅंथरने त्यांच्यावर हल्लाबोल केला. पॅंथरने आक्रमक होत मोरारजींची मुंबईतील सभा उधळून लावत त्यांना पाळता भुई थोडी केली. सत्ताधाऱ्यांनाही न डगमगता पॅंथर पुढे जात होता. वरळीच्या दंगलीत भागवत जाधव यांच्या डोक्यात उंच इमारतीवरून दगडी पाट्या टाकून त्यांची निर्घुणपणे हत्या केली. त्यावेळी लढवय्या पॅंथर्स राजा ढाले यांना पोलिसांनी ताब्यात घेत पिसाळलेल्या जनावरासारखी मारहाण करीत तुरुंगात टाकले होते. कालांतराने त्यांना जामिनावर सोडण्यात आले. कल्याण तालुक्यातील मोहोने तसा पॅंथर्सचा बालेकिल्ला होता. त्या काळात पोलिसी लाठीमारात जखमी झालेले राजा ढाले अंगावर फक्त शाल टाकून मोहोने येथे आले असताना तेथील कार्यकर्त्यांनी त्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढली होती.

साधना मासिकामध्ये राजा ढाले यांनी जबरदस्त लिखाण करून राज्यकर्त्यांची आणि प्रस्थापितांची झोप उडवली होती. राजा ढाले नामक पॅंथर कधीच कुणाच्या ताटाखालचे मांजर होऊन जगले नाहीत. महाराष्ट्रातील एका ख्यातनाम महिला साहित्यिकेने ‘वेश्या नसत्या तर काय झाले असते’, असे उद्गार काढले होते. त्यावर राजा ढाले यांनी त्यांना ‘आपल्या घरातील एखादी मुलगी या व्यवसायात यावी’ असे जाहीर सभेत सुनावत तिची बोलतीच बंद केली होती.

सगळेच पॅंथर एकीकडे कशाचीही परवा न करता महाराष्ट्रभर आंदोलने करीत दिमाखात आगेकूच करीत जात असताना नामदेव ढसाळ, राजा ढाले यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. या मतभेदात अखेर पॅंथर फुटली आणि महाराष्ट्रातील लाखो पॅंथर्स कासावीस झाले. मात्र शेवटपर्यंत त्या दोघांचे मनोमीलन झाले नाही. तू मोठा की मी मोठा, या हव्यासापोटी पॅंथरची शकले उडाली. चळवळीचे तोफ असणारे राजा ढाले दलित पॅंथरपासून अलिप्त झाले आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील पॅंथरला उतरती कळा लागली. नामदेव ढसाळांनी त्यानंतर पॅंथर सुरू ठेवली, मात्र तिची जहाल आक्रमकता कधीच जाणवली नाही. याच दरम्यानच्या काळात रामदास आठवले महाविद्यालयीन शिक्षणासाठी सांगलीहून मुंबईच्या सिद्धार्थ होस्टेलमध्ये शिकण्यासाठी आले होते. पॅंथर चळवळीचा सिद्धार्थ हॉस्टेल हा गाभा होता. त्या काळात राजा ढाले, नामदेव ढसाळ मंत्रालयात द्यायचे निवेदन असेल अथवा प्रेसनोट असेल ते आठवले यांच्याकडे देत. हा इतिहास आज हयात असलेल्या पॅंथर्सना ठाऊक असेल. राजा ढाले त्यानंतरच्या काळात मवाळ झाले, मात्र आजही १९७२ चा पॅंथरचा  काळ, राजा ढाले यांची भाषणे, बेधडक वक्तव्ये, रोखठोक लिखाण, जहाल साहित्य आजही दलित युवक विसरलेला नाही. अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाचे ते काही काळ राष्ट्रीय अध्यक्षही होते. मात्र बाळासाहेबांशी त्यांचे मतभेद झाल्याने त्यांच्यापासूनही ढाले अलिप्त झाले. 

चळवळीत तयार झालेला कार्यकर्ता व नेता नंतरच्या काळात कोणाच्या तरी आश्रयाला जात असतो, किंवा सत्तेसाठी तडफडत असतो. कोणत्याही मोहाला बळी न पडलेला, सत्तेला शरण न गेलेला पॅंथर म्हणून राजा ढाले यांच्याकडे समाज पाहात आहे. ते सत्तेच्या मोहात कधीच अडकले नाहीत. पॅंथर नंतर त्यांनी मास मूवमेंट संघटना स्थापन केली. मात्र तिला महाराष्ट्रात फारसा प्रतिसाद लाभला नाही. तरीही दलित पॅंथरची आक्रमकता म्हणजेच राजा ढाले ही प्रतिमा आणि स्थान पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मनामध्ये आजही जपले आहे. प्रामुख्याने दलित पँथरचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचे रणझुंजार लढवय्या असलेल्या या पॅंथरचे आपल्यातून निघून जाणे मनाला न पटणारे आहे. आंबेडकरी चळवळीला ऊर्जा देणाऱ्या लढवय्या पॅंथरला अखेरची मानवंदना !

 

लेखक :

सिद्धार्थ  अर्जुन  गायकवाड (पत्रकार) 
मोहने-कल्याण, जि. ठाणे.
मोब नं.: ९७७३८२९५०१