कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोकणी माणसाला खासदारांच्या उदासिनतेचा फटका

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोकणी माणसाला खासदारांच्या उदासिनतेचा फटका

मुंबई (प्रतिनिधी) :


कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोकणी माणसाला अनंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी वर्षोनुवर्ष पाठपुरावा करूनही कोकण रेल्वे बोर्ड त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या समस्या सोडविण्याकडे कोकण आणि मुंबईतील खासदारांचे लक्ष नाही. त्यांच्या या उदासिनतेचा फटका  कोकणवासीयांना बसत असल्याचा सूर नुकतेच दादर येथे छबिलदास शाळेत झालेल्या कोकणवासीयांच्या एका बैठकीत व्यक्त करण्यात आला.

सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोकण रेल्वेच्या संदर्भात काम करणारे ज्येष्ठ नेते डी. के. सावंत हे होते. यावेळी सत्‍यजीत चव्‍हाण, नितीन गांधी, कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समितीचे सुनील उतेकर, कोकण रेल्वे प्रवासी महासंघाचे राजेश फाटक, राजेद्र शिगवण, विलास पावसकर, कुंदन चाळके आदी मान्यवरांसह कोकणातील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सभेला उपस्थित होते. या बैठकीत कोकण रेल्वेचे प्रणेते मधु दडवते यांचे स्मरण म्हणून त्यांची प्रतिमा कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात लावण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, ज्या गाड्यांना थांबे नाहीत वा एखाद दुसरा थांबा आहे त्यांना अधिक पुरेसे थांबे देण्यात यावेत, नवीन गाड्या चालू करणे, मांडवी व कोकणकन्‍या या गाड्या २४ डब्यांच्या कराव्यात अशा मागण्यांचा पुनरुच्चार बैठकीत करण्यात आला.

पश्‍चिम   उपनरात ८ ते १० लाख कोकणातील कुटूंबे राहत असून त्यांच्यासाठी एकही दैनंदीन गाडी उपलब्ध नसल्याचा विषय यावेळी उपस्थित झाला. दोन माग॔ मालगाडी व दोन माग॔ प्रवासी रेल्‍वेसाठी असलेल्या नायगाव ते जुचंद्र हा ७ कि.मी. चार पदरी रेल्‍वे मार्गाला अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली होती. त्‍याचे सर्वेक्षणही झाले होते तरी तो मार्गी का लागला नाही याचे उत्तर लोकप्रतिनिधी देतील का, असा सवाल यावेळी करण्यात आला. लोकमान्य टिळक टमि॔नलवरुन सुटणारी डबलडेकर बंद होणार असल्याचा मुद्दा चर्चेला आला असता या गाडीची वेळ बदलावी किंवा पश्‍चिम उपनगरातून सोडावी अशी सूचना केली गेली. अशा अनेक मुद्यांवर यावेळी चर्चा झाली.

यासंदर्भात डी. के. सावंत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मुंबई-ठाणे-दिव्यावरून कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोकणी माणसाचे प्रवासात फार हाल होत आहेत. कोकण आणि मुंबईतील खासदार त्याकडे लक्ष देत नाहीत. वस्तुत: या समस्या सोडविणे हे त्यांचे काम आहे. २२ वर्षांपासून आम्ही अनेक मागण्या करतोय, त्यासाठी लढा देतोय, मात्र कोकण रेल्वे प्रशासन त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. यापुढे हा लढा तीव्र केला जाईल. प्रथम आम्ही खासदारांचे या समस्यांकडे लक्ष वेढणार आहोत. त्यानंतरही कुणी लक्ष दिले नाहीत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सावंत यांनी दिला. कोकण रेल्वेशी सबंधित समस्या आणि मागण्यांबाबत प्रथम लोकप्रतिनीधीना निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय याप्रसंगी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढील सभा शिवाजी मंदिर येथे घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.