डोंबिवली येथे पोस्ट ऑफिसमध्ये सुरु होणार पासपोर्ट सेवा केंद्र

डोंबिवली येथे पोस्ट ऑफिसमध्ये सुरु होणार पासपोर्ट सेवा केंद्र

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सन २०१७ पासूनच्या पाठपुरव्यानंतर डोंबिवली एमआयडीसी येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी मंजुरी मिळाली व लवकरात लवकर हे केंद्र सुरू व्हावे, यासाठी खासदार डॉ. शिंदे नेहमीच तत्पर होते. परंतु जागेअभावी सदर पासपोर्ट सेवा केंद्रास विलंब होत होता, त्यानंतर डोंबिवली एमआयडीसी येथील पोस्ट ऑफिसची निवड करण्यात आली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी विलंब झाला; त्यासाठी खा. शिंदे यांनी लोकसभा अधिवेशनदरम्यान संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांची भेट घेतली असता डोंबिवली एमआयडीसी येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी दिरंगाई न करता लवकरच लवकरच पासपोर्ट सेवाकेंद्र सुरु करण्याचे आश्वासित केले. आणि ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डोंबिवली पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करणार असल्याचे संचार राज्य मंत्रालयाकडून खा. डॉ. शिंदे यांना सूचित करण्यात आले असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारच्या गेल्या कालखंडात दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळात देशभरात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खा. शिंदे यांनी दिवंगत परराष्ट्रमंत्री मंत्री स्वराज यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करून कल्याण लोकसभा मतदारसंघात डोंबिवली एम आय डी सी येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळवली.

ठाण्यामधील पासपोर्ट सेवा केंद्र हे संपूर्ण मुंबई महानगर प्रादेशिक विभागातील एकमेव सेवा केंद्र असल्यामुळे या सेवा केंद्रावर मोठा ताण पडत होता. तसेच नागरिकांनाही लांब अंतरावरून यावे लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होते. त्यामुळे आता डोंबिवली एमआयडीसी येथील पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यास ठाणे जिल्ह्यातील उपनगर शहरांना खासकरून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर व इतर उपशहरांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.