कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या खाजगी डॉक्टरांना मानधन द्या - नरेंद्र पवार

कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या खाजगी डॉक्टरांना मानधन द्या - नरेंद्र पवार

कल्याण (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सुरुवातीपासूनच वैद्यकीय सेवा देणारे योद्धे चांगल्या प्रकारे काम करत आहेत. यामध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने वैद्यकीय संघटना व राज्य पातळीवर संपर्क साधून महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी डॉक्टरांना एकत्रित करून महानगरपालिकेची ताप, सर्दी, खोखल्यासाठी सुरू असलेली उपचार केंद्रे खाजगी डॉक्टरांच्या मदतीने चांगल्या पद्धतीने कार्यरत ठेवली आहेत. डॉक्टरांचा समूह सतत सक्रियपणे प्रयत्नशील राहून कोरोना मुक्तीसाठी काम करत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ते डॉक्टर सांभाळत असलेल्या सामान्य उपचार केंद्रांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण राहिली आहे. मात्र सेवा देत असलेल्या खासगी डॉक्टरांना महानगरपालिकेच्या मार्फत मानधन देण्यात यावे यासाठी भाजपा प्रदेश सचिव नरेंद्र पवार यांनी पत्रव्यवहार केला आहे.

खासगी डॉक्टरांना आपले दवाखाने पूर्णतः बंद ठेवून महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रामार्फत एकत्रितपणे सेवा देण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यांना आर्थिक मानधन द्यावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे व महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.

नागरीकांना कोरोना बाधित होण्यापासून दूर ठेवण्यासाठी सतत कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना कोणतेही मानधन दिले जात नाही. गेली दोन महिने सेवा देणारे डॉक्टर अजूनही कार्यरत राहण्यास तयार आहेत मात्र त्यांना मानधन देण्याची तरतूद झाली तर अजून जोमाने काम करतील. कारण आपले खासजी दवाखाने पूर्णतः बंद ठेऊन महानगरपालिकेच्या सोबत ते काम करत आहेत. अजूनही काम करण्यास ते उत्सुक आहेत मात्र त्यांच्या खर्चाचा प्रश्न अनुत्तरित आहे.

इतर महानगरपालिका खासजी डॉक्टरांना मानधन देत आहेत. उदा. नवी मुंबई, पनवेल इत्यादी. कल्याण डॉक्टर आर्मीच्या कोरोना योद्धांना त्यांच्या सक्रिय सेवेसाठी मानधन मिळायलाच हवे. जेणेकरून त्यांना या सेवेबद्दल आनंद आणि समाधान वाटेल अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे.