कार्यालये, गृहसंकुलातील लसीकरणाला ठाणे महानगरपालिकेची परवानगी

कार्यालये, गृहसंकुलातील लसीकरणाला ठाणे महानगरपालिकेची परवानगी

ठाणे (प्रतिनिधी) : कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापक लसीकरण मोहिम राबविता यावी यासाठी रूग्णालयांशी संलग्नता प्रस्थापित केलेल्या शहरातील विविध आस्थापना आणि गृहसंकुले यांना लसीकरणासाठी परवानगी देणारे लसीकरण धोरण आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी जाहिर केले आहे. दरम्यान या धोरणाचा आधार घेवून शहरातील विविध आस्थापना आणि गृह संकुलांनी पुढाकार घेऊन लसीकरण मोहिमेमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

ठाणे शहरातील पात्र लाभर्थींचे लसीकरण वेगाने व्हावे यासाठी कोरोना लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे अपरिहार्य असल्याने आणि तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाची व्यापकता वाढविण्यासाठी ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेने हे धोरण निश्चित केले आहे. या धोरणांतर्गत विविध कार्यालये, गृह संकुले यांना त्यांनी कोणत्याही रूग्णालयाशी संलग्नता प्रस्थापित केल्यानंतर लसीकरण करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कोविन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करता येणार आहे. सदरची नोंदणी झाल्यानंतर त्या कार्यालयांना, गृह संकुलांना महापालितर्फे स्वतंत्रपणे साईट मॅनेजर म्हणून समाविष्ट करून घेण्यात येईल.

खासगी कार्यालये, गृह संकुले यांना लसीकरणासाठी परवानगी देताना त्या ठिकाणी लसीकरणासाठी प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्षाची सुविधा उपलब्ध आहे किंवा नाही याची खात्री करण्यात येणार आहे. तसेच त्या ठिकाणी डॉक्टर्स, स्टाफ नर्स, डेटा एन्ट्री ॲापरेटर, इतर आरोग्य कर्मचारी, इंटरनेट, फर्निचर, रूग्णवाहिका, औषधे आदी सुविधा असल्याची खातरजमा महापालिकेच्या वैद्यकिय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे.

लसीकरणाचे लाभार्थी हे शासनाच्या धोरणानुसार निश्चित करण्यात येणार आहे. यामध्ये त्या त्या आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी, गृह संकुलांमध्ये वास्तव्यास असलेले रहिवाशी, घरगुती काम करणा-या व्यक्ती, सुरक्षारक्षक, माळी, लिफ्टमन, वाहनचालक यांना लसीकरणाचा लाभ घेता येणार आहे.  मात्र लसींचा अपव्यय टाळण्यासाठी लाभार्थ्यांची संख्या ही दहा आणि त्यापटीत असणे आवश्यक राहणार आहे. तथापि सदर केंद्रांसाठी लागणारा लसीकरणाचा साठा उपलब्ध करुन घेण्याची जबाबदारी ही संपूर्णतः ती ती कार्यालये किंवा गृह संकुले यांची राहणार असून लसीसाठी किती शुल्क आकारायचे हा अधिकार संबंधित आस्थापनांचा राहणार आहे. लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची नोंदणी Co-Win ॲपवर करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची राहणार असून लसीकरणानंतर एखाद्या लाभार्थ्यास काही लक्षणे आढळल्यास त्याच्या व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी 'त्या' आस्थापनांची, गृह संकुलांची राहणार आहे. या धोरणांतर्गत कार्यालये, गृह संकुले यांना Co-Win ॲपवर वॉक-ईन तसेच ऑन दी स्पॉट नोंदणीकरण करुन लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तथापि अशा प्रकारे ठराविक पात्र लाभार्थ्यांना लसीकरणाचा लाभ देण्यासाठी रुग्णालये, यांना Co-Win प्लॅटफॉर्मवर लसीकरण साईट महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.