नवी मुंबईतील स्वच्छतादूतांची छायाचित्रे झळकली स्वच्छता वाहनांवर!

नवी मुंबईतील स्वच्छतादूतांची छायाचित्रे झळकली स्वच्छता वाहनांवर!

नवी मुंबई (प्रतिनिधी) : स्वच्छतेमध्ये नेहमीच देशातील मानांकन उंचाविणारे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छतादूतांनाच सेलिब्रेटी बनविलेले असून यापुढे महापालिकेच्या स्वच्छता वाहनांवर 'निश्चय केला - नंबर पहिला' या निर्धार वाक्यासह स्वच्छता कार्यात उत्तम कामगिरी करणा-या स्वच्छतादूतांची छायाचित्रे झळकविण्यात आली आहेत.

महापालिकेच्या स्वच्छता कार्यात उत्तम कामगिरी करणा-या स्वच्छतादूतांची छायाचित्रे स्वच्छता वाहनांवर झळकविण्यात आलेली आहेत. नवी मुंबई शहर दररोज स्वच्छ राखण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावणा-या स्वच्छतादूतांच्या सेवाभावी कार्याचा यामधून गौरव झाल्याने सर्व स्तरांतून पसंती व्यक्त केली जात होत आहे. अशा आगळ्यावेगळ्या प्रकारे स्वच्छतादूतांचा सन्मान करणारी नवी मुंबई ही पहिलीच महानगरपालिका ठरली आहे.

महानगरपालिकेच्या लहान-मोठ्या अशा १२५ हून अधिक स्वच्छता वाहनांवर दैंनंदिन स्वच्छता राखण्यात उत्कृष्ट कामगिरी करणा-या १६ स्वच्छताकर्मींची छायाचित्रे या वाहनांवर प्रदर्शित करण्यात आली आहेत. 'देशात नंबर वन स्वच्छ शहराचा निर्धार करीत आम्ही सज्ज झालो आहोत, नवी मुंबईकर नागरिकहो आपणही सज्ज व्हा' असे नागरिकांना आवाहन करणारा संदेशच जणू या वाहनांवरील स्वच्छतादूतांच्या छायाचित्रांतून प्रभावी रितीने व्यक्त केला जात आहे.

या मानांकनामध्ये दैनंदिन शहर स्वच्छतेत मोलाचे योगदान देणा-या स्वच्छतादूतांचा महानगरपालिकेने नेहमीच सन्मान केला आहे. अगदी १ जानेवारीला संपन्न झालेल्या महानगरपालिकेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातही महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या हस्ते प्रतिकात्मक रितीने पुरूष आणि महिला स्वच्छतादूतांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला होता.