पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या उड्डाणपुलावर तीन महिन्यातच ‘खड्डा’

पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या उड्डाणपुलावर तीन महिन्यातच ‘खड्डा’

आंबिवली (प्रतिनिधी) : सुमारे १३ वर्षांनी पूर्णत्वास आलेल्या वडवली येथील रेल्वे उड्डाणपूलाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तीन महिन्यांपूर्वी लोकार्पण करण्यात आले होते. लोकार्पणा नंतर तीन महिन्यातच या उड्डाणपुलावर ‘पहिला खड्डा’ पडल्याचे दिसून येत आहे. 

आंबिवली नजीक वडवली येथे रेल्वेचे फाटक असून या फाटकावरून महापालिका आणि रेल्वेने संयुक्तपणे येथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचे काम सुमारे १३ वर्षांपूर्वी हाती घेतले होते. मात्र महापालिकेकडून या पुलासाठी लागणारी जागा मालकांच्या अडवणुकीमुळे संपादन करून घेण्यात दीर्घकाळ विलंब लागल्याने उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होण्यास १३ वर्षांचा कालावधी लागला. अखेरीस गेल्या मार्च महिन्यात या पुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले.

मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात राज्याचे नगरविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सदर उड्डाणपूलाचे लोकार्पण करण्यात आले. त्याला तीन महिने उलटत नाहीत तोच या उड्डाणपुलावर पहिला खड्डा पडल्याचे दिसून येत आहे. एवढ्या कमी काळातच पुलावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली की काय, असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. तसेच शिवसृष्टी येथे पुलाचा उतार रस्त्याला जोडलेल्या ठिकाणी पूल आणि रस्त्यामध्ये योग्य पॅचअप झाले नसल्याचेही दिसून येत आहे, परिणामी येथे वाहनांना धक्के बसत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. यामुळे पुलाचे बांधकाम तरी योग्य दर्जाचे झालेय ना, असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.