वृक्षारोपण करताय पण...

वृक्षारोपण करताय पण...

अनेक संत-महात्म्यांनी वृक्षारोपणाचा पुरस्कार केला आहे. आज लहान लहान मुलांना देखील ठाऊक आहे की, झाडांपासून ऑक्सिजन मिळतो. वृक्षराजी देखील सजीव असते, त्यांच्यातही जीव असतो. त्यांना बोलता येत नसले तरी त्यांनाही वातावरणातील बदल कळतो, त्याची जाणीव होते. आज यंत्र युगापासून माहिती तंत्रज्ञानाच्या काळातही मानवाचे जीवन झाडांशिवाय अपूर्ण असल्याचे वारंवार सिद्ध झाले तरी वृक्षतोडीचा मानवाचा हव्यास कमी होताना दिसत नाही. अगदी कोरोना महामारीने तर ऑक्सिजनची अत्यावश्यकता पुन्हा एकदा मानवाच्या लक्षात आणून दिली. असे असले तरी झाडांची म्हणावी तशी जोपासना करण्याकडे मानवाचे आजही दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.

मागे राज्य शासनाने कोट्यावधी झाडांची लागवड करण्याचे अभियान राबविले. यंदाही वृक्षारोपणाची हि प्रक्रिया सर्वच सरकारी विभागांकडून, सामाजिक-पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांकडून राबविण्यात येत आहे. एकीकडे हे वृक्षारोपण अभियान राबविले जात असताना अस्तित्वातील झाडांची जोपासना करण्यासाठी आपण काय करत आहोत, हेही पाहणे गरजेचे आहे. 

नागरिकांच्या उदासीनतेमुळे आजही सर्रास वृक्षतोड होताना पाहायला मिळत आहे. त्याच वेळी शहरातील रस्त्यांवरील झाडांना जाहिराती लावल्या जात असून त्यासाठी झाडांना खिळे मारले जात आहेत. या खिळ्यांमुळे झाडांना इजा पोहोचून त्यांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. तसेच हॉटेल्स, ढाबे, मॉल्स, शोरूम इत्यादीच्या परिसरात झाडांना विद्युत दिव्यांच्या माळा लावल्या जातात. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर अशा शहरी  भागात तसेच ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे झाडांच्या वाढीवर परिणाम होत आहे. या प्रकरणी स्थानिक प्राधिकरणाकडे तक्रारी करूनही संबंधितांविरोधात ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे एकीकडे आपण वृक्षारोपणाचे सोहळे साजरे करीत वृक्षप्रेमाचे प्रदर्शन करीत असलो तरी झाडांना खिळे ठोकणे, विद्युत रोषणाई करण्याला आळा घालू शकत नसल्याने आपले वृक्षप्रेम बेगडी असल्याचे स्पष्ट होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसह, वन विभागाने पुढाकार घ्यायला हवा!
---

लेखक: प्रविण आंब्रे (संयोजक, प्राणवायू सामाजिक संस्था, कल्याण.)