आंबिवली परिसरात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त 

आंबिवली परिसरात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त 

आंबिवली (प्रतिनिधी) : येथील मोहोने परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यातच आलेल्या वाढीव बिलांनी येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेच्या या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे.

भाजपचे स्थानिक नेते तथा परिवहन समितीचे माजी सभापती रमेश कोनकर व मोहोने-टिटवाळा मंडळाचे माजी उपाध्यक्ष प्रमोद घरत यांनी नुकतेच महावितरणच्या कल्याण पश्चिम उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यादव व मोहोने येथील कनिष्ठ अभियंता वर्मा यांची भेट घेऊन त्यांना नागरिकांच्या विजेच्या समस्या सोडविण्याची मागणी केली. आंबिवली भागातील विजेची मागणी वाढत असल्याने सध्याच्या विजेच्या यंत्रणेवर ताण पडत असल्याने या यंत्रणेची क्षमता वाढविण्याची गरज असल्याकडे कोनकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

दरम्यान, खासदार कपिल पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विजेचा प्रश्न लवकरच सोडवू, असा विश्वास भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.