कल्याण पश्चिम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जय्यत तयारी

कल्याण पश्चिम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जय्यत तयारी

कल्याण (प्रतिनिधी) : 
गत लोकसभा निवडणुकीत राज्यभरातून सर्वात कमी मतदान कल्याण पश्चिम-१३८ विधानसभा मतदारसंघात झाले आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीसाठी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली असून जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन या मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार दीपक आकडे यांनी केले आहे. 

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यक्रमाच्या तयारीची माहिती देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अजिंक्य पडवळ यांच्या वतीने सहाय्यक निवडणूक अधिकारी दीपक आकडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आकडे यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज असल्याचे सांगतानाच जास्तीत जास्त संख्येने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. निवडणूक तयारीची माहिती देताना ते म्हणाले की, कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ कल्याण शहर आणि ग्रामीण क्षेत्र असा विभागलेला आहे. या मतदारसंघात सध्याच्या मतदार यादीनुसार ४४४२२७ एवढे मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या २३५४८५ तर स्त्री मतदारांची संख्या २०८७३८ एवढी आहे. मतदानासाठी या मतदारसंघात ४२० मतदान केंद्राची व्यवस्था केली आहे. यात मूळ मतदान केंद्रे ४०९ असुन सहाय्यक मतदान केंद्रे ११ आहे. २७ सप्टेंबर २०१९ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येणार असून ४ ऑक्टोंबर २०१९ रोजी नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी ५ ऑक्टोंबर रोजी रोजी होईल. ७ ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे. २१ ऑक्टोंबर रोजी मतदान घेण्यात येईल तर २४ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होईल. कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे सर्व कामकाज कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली जवळील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून पार पडणार असून मतमोजणी देखील याच ठिकाणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

लोकसभा निडणुकीच्या वेळी सर्वात कमी मतदान कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात झाले होते. मात्र यावेळी शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करण्यात येणार आहेत. खास करून यंदा विधानसभेकरिता मतदान हे सर्वांच्या सोयीसाठी तळमजल्यावर घेण्यात येणार आहे. तरुणवर्ग मतदानासाठी बाहेर पडावा यासाठी महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचेही आकडे यांनी सांगितले.