कर्नाळा अभयारण्याच्या ११.६५ कोटींच्या निसर्गपर्यटन आराखड्यास तत्वत: मान्यता

कर्नाळा अभयारण्याच्या ११.६५ कोटींच्या निसर्गपर्यटन आराखड्यास तत्वत: मान्यता

मुंबई (प्रतिनिधी) : 
कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या ११.६५ कोटी रुपयांच्या निसर्ग पर्यटन आराखड्यास नुकतीच तत्वत: मान्यता देण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मंत्रालयात यासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल,  वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. २६ जानेवारी २०२१ पर्यंत या निसर्ग पर्यटन विकास आराखड्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचनाही वनमंत्र्यांनी यावेळी दिल्या. 

कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेलपासून १२ कि.मी तर मुंबई पासून ६५ कि.मी अंतरावर आहे. येथे मुंबईसह आसपासचे हजारो पर्यटक भेट देत असतात. कर्नाळा पक्षी अभयारण्यातील कर्नाळा किल्ला हा पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण आहे.  १२.१०९४ चौ.कि.मी क्षेत्राच्या अभयारण्यामध्ये पक्षांच्या १४७ प्रजाती आहेत. हिवाळ्यात ३७ स्थलांतरीत पक्षी येथे पहावयास मिळतात.   विविध प्रकारच्या ६४२ वृक्षप्रजाती येथे आहेत.  ११ प्रकारचे सस्तन प्राणी, २३ प्रकारचे सर्प, ५ प्रकारचे सरडे आणि बेडूक, १० प्रकारचे कोळी आणि फुलपाखरांच्या ५६ प्रजातीही येथे अस्तित्वात आहेत.

अभयारण्यात कर्नाळा किल्ला निसर्गवाट १.५० कि.मी, हरियल निसर्गवाट १ कि.मी, मोरटाका निसर्गवाट ५ कि.मी,गारमाळ निसर्गवाट ३ कि.मी अशा निसर्गवाटा आहेत. अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर अर्ध्या कि.मी. अंतरावर मयुर आणि भारद्वाज ही वन विश्रामगृहे आहेत. पश्चिमेकडे निसर्ग माहिती केंद्र, पर्यटक कुटी आणि हॉल आहे. निसर्ग पर्यटनामुळे स्थानिकांच्या रोजगारात वाढ होईल शिवाय अभयारण्याच्या संरक्षण आणि संवर्धनात लोकांचा सहभाग वाढेल हे लक्षात घेऊन या अभयारण्यातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.