जनजागरण यात्रेत काँग्रेस जिल्हाध्यक्षा विरोधात घोषणाबाजी 

जनजागरण यात्रेत काँग्रेस जिल्हाध्यक्षा विरोधात घोषणाबाजी 

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जनजागरण पदयात्रा सुरू असताना या पदयात्रेत काँग्रेस सेवादलाचे कार्यकर्ते बहिष्कार टाकून पदयात्रेतुन घोषणाबाजी देत बाहेर पडले त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता. काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्याचा प्रकार घडला.

महागाईच्या विरोधात काँग्रेसने संपूर्ण राज्यात जनजागरण पदयात्रा सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वातील ही पदयात्रा आज कल्याणमध्ये आली होती. मात्र, या यात्रेत मानापमान नाट्य रंगलं. काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी या पदयात्रेवर बहिष्कार टाकल्याने काँग्रेसमधील गटबाजी उघड झाली आहे.

नाना पटोले यांच्या नेतृत्वात कल्याणमध्ये जनजागरण पदयात्रा आली होती. मात्र, सेवा दलाने या पदयात्रेवर बहिष्कार टाकला आहे. रॅलीत प्रोटोकॉल पाळला जात नाही. केवळ दादागिरी सुरू आहे, असा आरोप करत काँग्रेस सेवादल कार्यकर्त्यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. नाना पटोले यांनी या घटनेची दखल घेतली आहे. हा प्रकार माझ्यासमोर तर झाला नाही. असा काही प्रकार झाला असेल तर तपास करून योग्य ती कारवाई करू, असं पटोले यांनी सांगितलं.