कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामुहिक छटपुजा करण्यास प्रतिबंध

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामुहिक छटपुजा करण्यास प्रतिबंध

ठाणे (प्रतिनिधी) : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचे सर्वधर्मिय उत्सव साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला असून यावर्षीचा छटपूजेचा उत्सवही अत्यंत साध्या पध्दतीने साजरा  करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सामुहिक छटपुजेला परवानगी न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तरी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.

या वर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात-आठ महिन्यात आलेले सर्वधर्मिय सण-उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे करण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षीचा छटपूजा सणही अन्य उत्सवांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे.

ठाणे शहरामध्ये उपवन तलाव, कोलशेत विसर्जन महाघाट, रायलादेवी तलाव, दत्तघाट (मासुंदा तलाव), कोपरी खाडी, पारसिक विसर्जन महाघाट, पारसिक रेतीबंदर या ठिकाणी छटपुजेसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली असून उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडू नये, नागरिकांनी गर्दी करू नये तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व भाविकांनी छटपुजा उत्सव गर्दी न करता साध्या पद्धतीने व घरगुती पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.