सातशे कुटुंबांची घरे वाचविण्यासाठी केंद्रीय वनमंत्र्यांना ‘अदलाबदली’चा प्रस्ताव 

सातशे कुटुंबांची घरे वाचविण्यासाठी केंद्रीय वनमंत्र्यांना ‘अदलाबदली’चा प्रस्ताव 

कल्याण (प्रतिनिधी) : टिटवाळा येथील माताजी टेकडी येथील वन जमीन सर्व्हे नंबर ५८ , ५८/अ, ब, क, ड हे भूखंड वन विभागाचे आहेत. त्यावर बांधलेल्या घरांमध्ये वास्तव्य करणाऱ्या सुमारे सातशे  कुटुंबांचे तेथेच पुनर्वसन करण्यात यावे यासाठी कल्याण येथील असमर्थ नागरिक सेवाभावी संस्थेने केंद्रीय पर्यावरण तथा वनमंत्री प्रकाश जावडेकर यांना साकडे घातले आहे. सदरची वन जमीन असमर्थ नागरिक सेवाभावी संस्थेला द्यावी व त्या बदल्यात ठाणे जिल्ह्यात अन्यत्र तेवढीच जमीन त्यावरील वन लागवडीसह आम्ही वन विभागाला देऊ, असा ‘अदलाबदली’चा प्रस्ताव जावडेकर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

संस्थेचे अध्यक्ष ऐलान बर्मावाला यांनी केंद्रीय पर्यावरण तथा वनमंत्री प्रकाश जावडेकर यांना यासंदर्भात पोस्टाने निवेदन पाठविले आहे. टिटवाळा येथील माताजी टेकडीवर अनेक वर्षांपासून सुमारे सातशे कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. ते वास्तव्य करीत असलेली जमीन ही वन विभागाची आहे. माणुसकीच्या नात्याने येथील कुटुंबांचा निवाऱ्याचा हक्क बाधित करण्यात येऊ नयेत. या घरांवर तोडक कारवाई न करता त्यांना राहण्याची मुभा द्यावी, अशी मागणी सदरच्या निवेदनात करण्यात आली आहे.

बर्मावाला यांनी आपल्या निवेदनात वन संवर्धन अधिनियम १९८० कायद्याचे उदाहरण देत वन विभागाची जागा राहण्यासाठी परिवर्तीत करावी अशी विनंती केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. संविधानामधील २१ कलमामध्ये निवारा हा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने आणि मानवतेच्या दृष्टीने विचार करून माताजी टेकडीवरील नागरिकांकडे दयेच्या भावनेने बघावे, अशी विनंती सदर निवेदनात केली आहे. त्याकरिता सदरची वन जमीन असमर्थ नागरिक सेवाभावी संस्थेला द्यावी, त्यावरील सध्याची घरे तशीच ठेवण्यात येतील व त्या बदल्यात ठाणे जिल्ह्यात अन्यत्र तेवढीच जमीन त्यावरील वन लागवडीसह आम्ही वन विभागाला देऊ, असा प्रस्ताव केंद्र सरकारला देण्यात आला आहे. राज्याचे मुख्य वन विभाग अधिकारी आणि ठाणे उपवनसंरक्षक अधिकारी यांनाही याच आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.