हत्तींचा प्रश्न सोडविण्यासाठी हत्ती कॅम्प उभारण्याचा प्रस्ताव - उदय सामंत

हत्तींचा प्रश्न सोडविण्यासाठी हत्ती कॅम्प उभारण्याचा प्रस्ताव - उदय सामंत

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : हत्तींच्या प्रश्नावर वन विभागाने हत्ती कॅम्पसाठी प्रस्ताव तयार केला आहे. या कॅम्पच्या उभारणीसाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. त्यासाठी राज्य शासनाच्या स्तरावर लागणारे सर्व परवाने व मंजूरी तातडीने देण्यात येतील, अशी माहिती असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी दोडामार्ग तालुक्यातील केर येथे केले. हत्तींमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांनी केर, मोरले या गावांना नुकतीच भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधला. 

यावेळी सामंत पुढे म्हणाले की, केंद्र शासनाच्या स्तरावर खासदार विनायक राऊत या विषयात लक्ष घालतील आणि हा कॅम्प लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न केले जातील. अधिकाऱ्यांनीही लोकांसाठी काम करत असल्याची प्रामाणिक भावना बाळगावी, अशा प्रकारची भावना बाळगून काम केल्यास कामे लवकर व चांगली होतात, असेही ते म्हणाले. दोडामार्ग तालुक्यातील केर, भेकुर्ली, मोरले आणि घोडगेवाडी गावामध्ये हत्तींचा प्रश्न मोठा आहे. या प्रश्नावर प्रभावी उपाययोजना होणे गरजेचे आहे. त्यामुळेच हा प्रश्न कायमचा निकाली निघेल.

यावेळी उपवनसंरक्षण समाधान चव्हाण यांनी हत्तींच्या बंदोबस्तासाठी तसेच नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणारी रक्कम याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संजय पडते, संदेश पारकर, प्रमानंद देसाई, केरच्या सरपंच मिनल देसाई, मोर्लेचे सरपंच महादेव गवस, कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेन बेन, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर आदी उपस्थित होते.