इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवकची कल्याणमध्ये निदर्शने

इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवकची कल्याणमध्ये निदर्शने

कल्याण (प्रतिनिधी) : इंधन दरवाढी विरोधात सोमवारी कल्याणमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली कल्याण पूर्वेतील टाटा पॉवर हाउस येथे कल्याण-शिळ रस्त्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. केंद्रातील भाजप सरकारने सत्तेत येण्याअगोदर पेट्रोल, डिझेल दरवाढीचा प्रमुख मुद्दा प्रचारात आघाडीवर ठेवला होता. त्यानंतर भाजप सलग दोन वेळा देशात सत्तेवर आला. वाढत्या इंधन दरांमुळे वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागत आहे तसेच महागाईसुद्धा वाढत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर सगळ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. या सर्वांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार विरोधात आज निदर्शने करण्यात आल्याचे युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी वारंवार होणाऱ्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी जवळील तलाठी कार्यालयापर्यंत दुचाकी ढकलत नेत संबंधित तलाठी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, प्रशांत नगरकर, प्रशांत माळी, श्याम आवारे, योगेश माळी, स्वप्नील रोकडे, मीनाक्षी आहेर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.