कल्याण डोंबिवलीतील पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्या 

कल्याण डोंबिवलीतील पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्या 

कल्याण (प्रतिनिधी) :
गेल्या दोन आठवड्यात कल्याण डोंबिवली शहरात अतिवृष्टीमुळे अनेक भागातील रहिवासी व बाजारपेठ परिसरात पाणी शिरून हजारो लोकांचे प्रचंड हानी झाली. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. पंचनामे करण्यात वेळ घालविण्या ऐवजी सर्वच पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी आम आदामी पार्टीने शासनाकडे केली असून यासंदर्भातील एक निवेदन त्यांनी नुकातेच कल्याणच्या तहसीलदार कार्यालयात दिले आहे.

आपचे कल्याण लोकसभा अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली  रवि केदारे, राजेश शेलार, संजय कातकडे, उमेश कांबळे, आमीर बेग, सचिन जोशी आदी पदाधिकाऱ्यांनी कल्याण डोंबिवलीतील पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याबाबतचे निवेदन कल्याण तहसीलदारांना दिले. कल्याण शहरातील वालधुनी, अशोकनगर, शिवाजी नगर, खडेगोळवली, विठ्ठलवाडी, मांडा-टिटवाळा, मोहोने येथील फुलेनगर, सम्राटनगर, यादवनगर, सहकारनगर, आंबेवाडी, विजयनगर असा परिसर, शहाड गावठाण, भवानीनगर परिसर, गोविंदवाडी, रेतीबंदर भाग, उंबर्डे येथील काही भाग, वरप, कांबा या गावांचा परिसर तर डोंबिवली शहरातील कोपर, भोपर, मोठा गाव, देवीचा पाडा, महाराष्ट्र नगर, औद्योगिक वसाहत परिसर, पलावा, निलाजे अशा अनेक परिसरात घरांमध्ये पाणी शिरून हजारो कुटुंबांचे प्रचंड नुकसान झाले. घरातील अन्नधान्याची यात नासाडी झाली. यातील अनेक कुटुंबे कमकुवत आर्थिक गटातील असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली. घरातील साहित्या-बरोबरच मुलांच्या शैक्षणिक साहित्याचेही नुकसान झाले आहे. 

पुराचा फटका बसलेल्या सर्व कुटुंबांचे शासन स्तरावर सर्वेक्षण करण्यात येत आल्याचे समजते. मात्र ही कार्यवाही पूर्ण होऊन प्रत्यक्षात पूरग्रस्तांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्यात बराच उशीर लागणार असल्याने तोपर्यंत या कुटुंबांचे प्रचंड हाल होणार आहेत. तरी या कुटुंबांना त्वरेने आर्थिक मदत देण्यास शासनाने सुरुवात करावी, अशी विनंती आपने सदर निवेदनात केली आहे. 

त्याचप्रमाणे पूरपरीस्थितीने ग्रस्त असलेल्या परिसरात घाणीचे पाणी शिरल्याने, प्रचंड ओला कचरा निर्माण होऊन घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक भागात विविध आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता केवळ आरोग्य केंद्र व रुग्णालयांवर अवलंबून न राहता प्रभागा-प्रभागात शाळांमध्ये आरोग्य तपासणी मोहीम राबविण्याची मागणी आपने केली आहे.