पुंडलिक लक्ष्मण म्हात्रे इंग्लिश स्कुलचे स्नेहसंमेलन संपन्न 

पुंडलिक लक्ष्मण म्हात्रे इंग्लिश स्कुलचे स्नेहसंमेलन संपन्न 

कल्याण (प्रतिनिधी) : 
विद्यार्थ्याला मिळणाऱ्या टक्केवारीला अधिक महत्व न देता आम्ही त्याच्या व्यक्तिमत्वला विशेष महत्व देतो. विद्यार्थ्याला मिळणारी टक्केवारी कमी असली, त्याचे व्यक्तिमत्व चांगले असेल तर, असा विद्यार्थी भविष्यात कोणत्याही क्षेत्रात चांगले काम करू शकतो. यामुळे विद्यार्थ्याचे चारित्र्य आणि व्यक्तिमत्वाला आम्ही अधिक महत्व देत असल्याचे मत मुख्याध्यापक तथा सचिव निलेश म्हात्रे यांनी व्यक्त केले. नेवाळी नाका येथील पुंडलिक लक्षमण म्हात्रे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव व वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन डोंबिवली पूर्वेतील सावळाराम क्रिडा संकुलातील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर मॉडेल कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. विनय भोळे, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, आयडियल कॉलेजचे संचालक विजय उपाध्याय, संस्थेचे सल्लागार तथा जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. शंकर पुंडलिक म्हात्रे, आगरी युथ फोरम  खजिनदार तथा अभिनव बॅंकेचे व्यवस्थापक पांडुरंग म्हात्रे, गुलाब लोखंडे, नेवाळीचे सरपंच चैनु जाधव, सहसंचालिका अर्चना म्हात्रे, पंचायत समितीच्या सदस्या तेजश्री जाधव, राजेश म्हात्रे आदी मान्यवर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. विनय भोळे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सांगितले की, निलेश म्हात्रे हा आमच्या संस्थेचा विद्यार्थी आहे. आज त्याने पुंडलिक लक्षमन म्हात्रे इंग्लिश मिडीयम स्कुल नावाची शिक्षण संस्था उभी करीत आज नावारूपाला आणली आहे. त्यांच्या भविष्यातील प्रगती आणि वाटचालीला शुभेच्छा देत असल्याचे ते म्हणाले.

आगरी युथ फोरम संस्थेचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलतांना सांगितले की, अशा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शाळेच्या आणि शिक्षणाच्या बाबतीत ओढ निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक शाळा-कॉलेजात असे सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजेत. कारण एखादा विद्यार्थी शिक्षणात मनाने कमी पडत असेल तर, अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून त्याच्यात असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळतो.कार्यक्रमात भाग घेऊन आपल्यातील कला सादर केल्याने त्याच्या मनाला उभारी मिळते आणि शिक्षणाची ओढ त्याच्या मनात निर्माण होते असा महत्वाचा संदेश गुलाब वझे यांनी दिला. सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. तद्ननंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत मान्यवरांसह पालकांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी हॉलमध्ये पालकांनी मोठी गर्दी केली होती.