पंजाब नॅशनल बँकेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पंजाब नॅशनल बँकेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

कल्याण (प्रतिनिधी) : पंजाब नॅशनल बँकने जीवन ज्योती हेल्थ केअर सेंटर आणि डिव्हाईन पॉवर हेल्थ फौंडेशन यांच्या सहकार्याने नागरिक व बँकेच्या ग्राहकांसाठी शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बँकेच्या मुरबाड रोड शाखेत हे शिबीर संपन्न झाले. 

सदर शिबिरात नाडी परीक्षण, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी,आहार सल्ला, बीएमआय, ऑक्सिजन लेवल तपासणी, तसेच रक्त तपासणी, संपूर्ण शारीरिक तपासणी अल्प दरात तपासणी करण्यात आली. बँकेच्या ठाणे सर्कलचे सर्कल हेड अर्जुन मंचदानी यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे बँकेचे शाखा व्यवस्थापक हर्षवर्धन वाडे यांनी यावेळी सांगितले. दिवसभरात सुमारे दीडशे जणांनी या शिबिराचा लाभ घेतल्याचीही माहिती त्यांनी दिली.

दैनंदिन जीवनात नागरिक बऱ्याचदा आपल्या आरोग्याबाबत पूर्व काळजी घेत नाहीत. त्यामुळे आजारी पडल्यावर त्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो. याकरिता त्यांना आरोग्याबाबत सजग करण्याचे काम अशा शिबिराच्या माध्यमातून केले जात असून नागरिकांनी आरोग्य तपासणीबाबत जागृत होण्याची आवश्यकता असल्याचे जीवन ज्योती हेल्थ केअर सेंटरचे संस्थापक डॉ. अशोक जाधव यांनी यावेळी सांगितले.  

डॉ. जाधव आणि त्यांचे सहाय्यक डॉ. पल्लवी भागवत, कोमल भागवत आदींच्या टीमने बँकेचे ग्राहक व कर्मचारीवर्गाची आरोग्य तपासणी करीत त्यांना आरोग्य विषयक सल्ला दिला. शिबीर यशस्वी करण्यासाठी बँकेच्या अधिकारी अमिता मंगेश ब्रीड, प्रियांका रानडे, अपेक्षा मोरे, नागेश,  नवनीत शिंदे, मर्लिन आदींनी सहभाग घेतला.